
इचलकरंजीकरांना दिलासा
इचलकरंजीकरांना दिलासा
कृष्णा योजनेचे दोन्ही उपसा पंप सुरू; पाणीपुरवठा होणार सुरळीत
इचलकरंजी, ता. २३ ः कृष्णा नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने कृष्णा योजनेचे दोन्ही उपसा पंप कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.
शहराला कृष्णा नदीतून बहुतांशी पाणीपुरवठा केला जातो, पण कृष्णा नदीतील पाण्याची पातळी खालावल्याने मजरेवाडी उपसा केंद्रातील एक पंप बंद पडला होता. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. शिवाय पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी खालावली होती. त्यामुळे पंचगंगा योजनाही बंद पडण्याची भीती होती. केवळ कट्टी मोळा योजनेचाच मोठा आधार निर्माण झाला होता.
यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. दोन-तीन दिवसानंतर येणारे पाणी पाच दिवसांनंतर सोडले. त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. दुसरीकडे धरणातून पाणी सोडण्यासाठी पालिका प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत होते. त्याला यश आले आहे. कृष्णा आणि पंचगंगा नदीपात्रात धरणांतून पाणी सोडले आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मजरेवाडी उपसा केंद्रातील दोन्ही उपसा पंप सुरू झाले आहेत. पंचगंगा आणि कट्टी मोळा योजनाही सक्षमपणे सुरू झाली आहे. त्यामुळे आवश्यक पाणी साठा उपलब्ध होत आहे. परिणामी, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दोन दिवसांत शहरात पूर्ववत एक व दोन दिवसांतर पाणी मिळणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता बाजी कांबळे यांनी सांगितले.
----------
पावसाने दडी दिली तरी तयारी
अद्याप दमदार पावसाने सुरुवात केलेली नाही. पावसाने पुढील आणखी काही दिवस दडी दिल्यास पुन्हा नदीपात्र कोरडे होण्याची भीती आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून कृष्णा योजनेच्या मजरेवाडी उपसा केंद्राजवळ खोल डोहात सोडलेला सबमर्सिबल पंप कार्यान्वित करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून आतापासूनच दक्षता घेतली जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70665 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..