उसाला लागली... हुमणी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उसाला लागली... हुमणी!
उसाला लागली... हुमणी!

उसाला लागली... हुमणी!

sakal_logo
By

48031

उसाला लागली... हुमणी!
पाऊस लांबल्याचा परिणाम; खोडव्यावर जास्त प्रादुर्भाव
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ : मॉन्सून लांबल्याचा परिणाम खरीप पिकाबरोबरच उसावरही झाला आहे. उसाला हुमणी लागली आहे. लावणीच्या तुलनेत खोडव्यावर त्याचा अधिक प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. हुमणीचा प्रादुर्भाव झालेल्या उसाची वाढ खुंटते. शिवाय ऊस पडण्याचाही धोका निर्माण होतो. त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते.
वेळेआधी दाखल होईल असा अंदाज असणाऱ्या मॉन्सूनने यंदा फारच उशीर केला. चक्क जून महिन्याचे पहिले तीन आठवडे कोरडेच घालविले. त्याचा परिणाम पिकांवर होताना दिसत आहे. पेरणी झालेल्या पिकांची शाश्‍वती देणे मुश्किल झाले आहे, तर बऱ्याच क्षेत्राची अद्याप पेरणी खोळंबली आहे. भात, सोयाबीन, भुईमूग या खरीप पिकांची ही अवस्था आहे; पण पाऊस लांबल्याचा उसावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
मुळात यंदा वळीव पाऊस चांगला झाला. या पावसात कीड अधिक होते. नेमकी हीच बाब उसावर हुमणीचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. त्यात भर म्हणून मॉन्सून लांबला. पाऊस चांगला झाला, तर उसामध्ये पाणी तुंबून राहते. त्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी होतो; पण पाऊसच लांबल्याने जमिनीला पुरेसे पाणी मिळालेले नाही. त्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव वाढण्यास एकप्रकारे मदतच झाली आहे.
लावणीच्या उसाला तुलनेत कमी फटका बसला आहे; मात्र खोडव्यात हुमणीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. खोडव्याला दिलेले पाणी पूर्ण बोधावर जात नाही. त्यामुळे बोधात असलेले हुमणीचे किडे जिवंत राहत आहेत. त्यांच्याकडून उसाची मुळे कुरतडली जातात. परिणामी, उसाची वाढ खुंटत आहे. शिवाय पावसाळ्यात ऊस पडतो. त्यामुळे वाढीवर परिणाम होऊन उत्पादन घटण्याचा धोका आहे.
-----------------
चौकट
प्रतिबंधात्मक उपायच महत्त्वाचे...
हुमणीचा प्रादुर्भाव झाल्यास औषधांचा वापर करता येतो; पण औषध मारल्यानंतर हुमणी अधिक खोल जाते. औषधांचा प्रभाव कमी झाला की, ती पुन्हा वर येते. अशा परिस्थितीत उसामध्ये बोधाबरोबरच पाणी तुंबवून ठेवल्यास थोडाफार फरक पडतो. हे सारे उपाय हुमणीचा प्रादुर्भाव झाल्यानंतरचे आहेत; पण त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करणेच केव्हाही चांगले मानले जाते. वळीव पाऊस बरसतो त्या काळात निर्माण होणारे किडे पकडण्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅप बसविणे अधिक सोईचे असल्याचे जाणकारांतून सांगितले जाते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70693 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top