
महापालिकेत प्रमाणपत्र
बोगस वैद्यकीय प्रमाणपत्राबाबत
मनपाला ‘प्रहार’ पक्षाची नोटीस
कोल्हापूर, ता. २३ ः माहितीच्या अधिकारात सावित्रीबाई फुले रूग्णालय व आयसोलेशन हॉस्पिटलनी दिलेल्या माहितीमुळे कत्तलखान्यातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी न करता बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र दिली आहेत. ही प्रमाणपत्रे देणाऱ्या डॉ. विजय पाटील यांची चौकशी करण्याऐवजी महापालिका प्रशासन त्यांची पाठराखण करून अन्न व औषध प्रशासनाची दिशाभूल करत आहे. त्यामुळे अंतिम इशारा म्हणून महापालिकेला वकिलांमार्फत नोटीस दिली आहे. दहा दिवसात अपेक्षित कारवाई न झाल्यास आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांविरोधात जनहित याचिका दाखल केली जाईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला.
पत्रकात म्हटले आहे, कोरोनाकाळात झालेल्या प्रकारात कत्तलखान्यातील कर्मचाऱ्यांची तपासणी आवश्यक होती. त्यावेळी डॉ. पाटील यांनी महापालिकेच्या लेटरहेडचा गैरवापर करून त्या कर्मचाऱ्यांना बोगस शिक्क्यांनिशी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र दिले. पक्षातर्फे तसेच अन्न व औषध प्रशासनाने महापालिकेबरोबर पत्रव्यवहार केला होता. तरीही महापालिकेने विभागीय आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाची दिशाभूल करणारे पत्र दिले आहे. त्यापूर्वी सावित्रीबाई फुले रूग्णालयाने कोणतीही तपासणी न केल्याने प्रमाणपत्र दिले नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. आयसोलेशन हॉस्पिटलमधूनही प्रमाणपत्र दिले नसल्याचा अहवाल दिला आहे. माहितीच्या अधिकारात माहिती विचारल्यानंतर सावित्रीबाई फुले रूग्णालयात ९ व्यक्तींनी तपासणी केलेली नाही. त्यामुळे प्रमाणपत्र दिलेले नाही. तसेच लॅब नसल्याने प्रमाणपत्र देऊ शकत नाही असे आयसोलेशन हॉस्पिटलने माहिती दिली आहे.
कोळी यांनी आठ महिन्यांपासून पाठपुरावा केल्यानंतरही दिशाभूल केली जात असल्याने आता अंतिम इशारा म्हणून वकिलामार्फत नोटीस दिली असून दहा दिवसात योग्य कारवाई न झाल्यास जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70885 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..