रजर्षी शाहू महाराजांचा अमेरिकेतील वर्तमानपत्रात गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रजर्षी शाहू महाराजांचा अमेरिकेतील वर्तमानपत्रात गौरव
रजर्षी शाहू महाराजांचा अमेरिकेतील वर्तमानपत्रात गौरव

रजर्षी शाहू महाराजांचा अमेरिकेतील वर्तमानपत्रात गौरव

sakal_logo
By

राजर्षी शाहू फोटो

राजर्षी शाहू जयंती विशेष -
---
राजर्षी शाहूंचा अमेरिकन दैनिकांकडून गौरव
१९१२ ला वाढदिवसाच्या बातम्या प्रसिद्ध; आधुनिक विचारसरणीचे, उदारमतवादी राजे असा उल्लेख

ओंकार धर्माधिकारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकर्तुत्वाचा डंका साऱ्या देशात होता, विदेशातही त्यांची किर्ती होती. नुकतेच याचे काही संदर्भ पुढे आले. इतिहास अभ्यासक ॲड. केदार मुनिश्वर यांनी हे संदर्भ संकलित केले आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १९१२ ला झालेल्या वाढदिवसाच्या अमेरिकेतील विविध दैनिकात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यात महाराजांचा उल्लेख भारतातील आधुनिक विचारसरणीचे, उदारमतवादी राजे असा केला आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज खऱ्या अर्थाने लोकराजे होते. त्यांनी करवीर संस्थानात ज्या सामाजिक, आर्थिक सुधारणा केल्या त्याचे दूरगामी परिणाम पाहण्यास मिळतात. शेती, उद्योग, व्यापार आणि शिक्षण यातही महाराजांनी मूलभूत कार्य केले. राजर्षी शाहू महाराजांची महती देशात तसेच विदेशातही होती. २६ जून १९१२ ला राजर्षी शाहू महाराजांचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाची बातमी अमेरिकेतील विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. ‘द बेमिदजी डेली पायोनिअर’ या दैनिकात भारतातील प्रगतशील विचारांचे, उदारमतवादी आणि सामर्थ्यवान राजे शाहू महाराज यांचा ३८ वा वाढदिवस, असे वर्णन केले आहे. तसेच त्यांचे जनक घराणे, त्यांचे शिक्षण याचेही तपशील बातमीत दिले आहेत. ‘द वॉशिंटन टाईम्स’ या दैनिकातही महाराजांच्या वाढदिवसाची बातमी आहे. महाराज हे अन्य भारतीय संस्थानिकांपेक्षा वेगळे आहेत. ते अत्यंत सामर्थ्यवान आणि आधुनिक विचारांचे आहेत. अशी स्तुती या बातमीत आहे. ‘द रिचमंड’ या दैनिकात तर शाहू महाराजांच्या वाढदिवसाची बातमी देताना त्यांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज असा केला आहे. त्यांचा जन्म, राजकोट कॉलेजमधील शिक्षण याबाबत माहिती दिली आहे. ते चांगला राज्यकारभार करत असल्याचेही या बातमीत म्हटले आहे. ‘द लेक काउंटी टाईम्स’ याही दैनिकात महाराजांच्या वाढदिवसाची बातमी आहे. या सर्वच बातम्यांत महाराजांचा जन्म, कागलचे मूळ घराणे, महाराजांचे शिक्षण, धोरणे याबाबत माहिती दिली होती .
------------------------------------------------------------------------------------------------------------
जन्म तारखेचा समकालीन पुरावा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस २६ जून की २६ जुलै याबाबत बरीच वर्षे संभ्रम होता. अखेर संस्थानकालीन कागदपत्रे आणि ब्रिटिश कालीन पुरावे या आधारे संशोधकांनी २६ जून ही तारीख नक्की केली. शासनानेही त्यावर मोहर उमटवली. अमेरिकेतील या बातम्या २६ जूनला प्रसिद्ध झाल्या असून त्यात आज वाढदिवस असा उल्लेख आहे. त्यामुळे संशोधकांच्या मताला पुष्टी देणारा हा समकालीन दाखला आहे.
---------------------------------------------------------------------------------
लायब्ररी ऑफ काँग्रेस या अमेरिकेतील ग्रंथालयाच्या संकेतस्थळावर या बातम्या मिळाल्या. त्यातील मजकूर आणि त्यांनी केलेले वर्णन यातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तुंग प्रतिमा दिसून येते. त्यांचे कार्य केवळ एका संस्थानापुरते मर्यादित नसून त्याचे दूरगामी परिणाम सर्वत्र झाल्याचे दिसून येते.
- ॲड. केदार मुनिश्वर, इतिहास अभ्यासक

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71425 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..