
शाहू व्याख्यानमाला
३१७९१
राजर्षी शाहूंकडून धर्मतत्त्वज्ञानाचा समन्वय
राजा दीक्षित; राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे व्याख्यानमालेची सांगता
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः ‘‘राजर्षी शाहू महाराजांनी विविध धर्मतत्त्वज्ञानांचा समन्वय साधून समतेचे आचरण केले. ज्या धर्मतत्त्वात मानवतावाद व अस्पृश्यतेला विरोध करण्याचा विचार होता, असे विचार तसेच सर्व धर्मातील चांगली मूल्ये स्वीकारली. त्यातूनच समतेचे व सर्वधर्म समभावाचे समतोल विचार राजर्षी शाहू महाराजांनी आचरणात आणले’’, असे मत धर्मशास्त्राचे अभ्यासक राजा दीक्षित यांनी आज येथे व्यक्त केले. राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे सुरू असलेल्या राजर्षी शाहू व्याख्यानमालेत दीक्षित यांनी ‘शाहू महाराजांचे धर्म विचार’ या विषयावर विचार मांडले.
श्री. दीक्षित म्हणाले, ‘‘शाहू महाराजांचे धर्म विचार व्यक्तिगत जीवन व राजकर्तव्य याला विविध सामाजिक आयाम होते. त्याला ऐतिहासिक मूल्य प्राप्त झाले. अशा अंगाने शाहू महाराजांचे धर्म विचार लक्षात घ्यावे लागतील. शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत. ते सगळे एकमेकांना जोडलेले आहेत. त्यांच्या धर्म विचारात सामाजिक दृष्टिकोन होता.’’
ते म्हणाले, ‘‘शाहू महाराजांचे सुरुवातीच्या काळात धर्म विचार सर्वसामान्यांप्रमाणेच होते. परंपरागत चौकटीत हिंदू विचार व धर्माचरण ते करीत होते. जीवनातील विविध कुलाचार करीत होते. त्यांची धर्म श्रद्धा होती. ती त्यांनी जीवनभर जपली. महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे वेदोक्त प्रकरणावेळी जे घडले तेव्हापासून त्यांच्या धर्मविचाराला वेगळे वळण प्राप्त झाले. ते सामाजिक अंगाने पुढे गेले.’’
दीक्षित म्हणाले, ‘‘ईश्वर व भक्तात मध्यस्थ असू नये, असा धागा पकडून शाहू महाराजांनी धार्मिक आचरणाची अपेक्षा मांडली. तो विचार त्यांनी पुढे नेला. समाज सुधारणेच्या रूपाने तो विचार पुढे नेला. याच काळात ब्राह्मणी अनाठायी वर्चस्व, पुरोहितशाही, त्यातून होणाऱ्या भेद व अन्यायाला विरोध केला. धार्मिक आचरणात समानता मांडणारा विचार ते पुढे नेत होते. त्यासाठी त्यांना विद्रोहाची भूमिका घ्यावी लागली. त्यातून संघर्ष झाले, काही वेळा टीका झाली; मात्र त्यांनी धर्मातील आचरणात समानतेचा विचार त्यांनी पुढे नेला.’’
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर, पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, एस. बी. सुर्वे आदी उपस्थित होते. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. व्याख्यानमालेची आज सांगता झाली.
व्यक्ती विरोध नाही
‘‘तत्कालीन ब्राह्मण प्रशासकीयाला विरोध होता. एखादी व्यक्ती ब्राह्मण आहे म्हणून शाहू महाराजांनी त्याला कधीही विरोध केला नाही, तर तत्कालीन ब्राह्मणी प्रशासकीय वर्चस्वाला त्यांनी विरोध केला. हे करताना शाहू महाराजांनी राज्यातील पुरोगामी चळवळींशी सतत संवाद ठेवला. महाराष्ट्रातील समाज जीवनात सुधारणा व चळवळी करण्याचे कार्य ज्या संस्थांनी केले त्यांच्याशीही त्यांचा संवाद होता. परिणामी सामाजिक धर्म आचरणाचा प्रभाव वाढण्यास मदत झाली, असेही श्री. दीक्षित यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71504 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..