
वाजला भोंगा
31846
१९ वर्षांनंतर वाजला शाहू मिलचा भोंगा
कोल्हापूरकरांनी अनुभवला जुना काळ; कार्यकर्त्यांना करावी लागली धडपड
कोल्हापूर, ता. २६ ः ज्येष्ठ, तरुण, लहानग्यांमुळे शाहू छत्रपती मिलचा आवार आज बऱ्याच काळानंतर गजबजून गेला होता. मिलच्या भोंग्याची अकराची वेळ निघून गेली असली तरी कार्यकर्त्यांच्या धडपडीनंतर आज सकाळी पावणेबाराला मिलमध्ये भोंग्याचा आवाज घुमला. तब्बल १९ वर्षांनंतर ‘तो’ आवाज ऐकल्यानंतर साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून आनंद साजरा केला. निमित्त होतं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १४८ व्या जयंतीचे.
शाहू छत्रपती मिलच्या भोंग्याचा आवाज कोल्हापूरकरांच्या जीवनाचा अविभाज्य भागच झाला होता. त्याच्या आवाजाने कोल्हापूरकरांचा दिवस सुरू व्हायचा. मिल ३१ ऑगस्ट २००३ मध्ये बंद झाल्यानंतर तो आवाजही बंद झाला.
मावळा कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी उमेश पोवार यांच्या नेतृत्वाखाली वर्गणी काढून नवीन भोंगा आणून जयंतीचे औचित्य साधत तो वाजवण्याचे ठरवले. पोवार व कार्यकर्त्यांनी भोंगा आणला पण वस्त्रोद्योग मंडळाची परवानगी नव्हती. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला. आज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती असल्याने ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी काय व्हायचे ते होऊ दे, असे म्हणत शाहू मिलमध्येच भोंगा वाजवायचा असे ठरवले. मिलच्या दरवाजाजवळील जागेत भोंगा आणून ठेवला. बाहेरून वीज कनेक्शन घेतले. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पूजन करून पावणेबाराला भोंगा वाजवला. माजी कर्मचारी विलास शिंदे यांना गलबलून आले. कायम वाजवण्यासाठी रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे.
यावेळी आर. के. पोवार, मारुती पाटील, मोहन साळोखे, बाबा इंदुलकर, वसंतराव मुळीक, प्रा. जयंत पाटील, आदिल फरास, शिवाजी कवाळे, अनिल कदम, सत्यजित कदम, सुनील कदम, बाबा पार्टे, दुर्गेश लिंग्रस, किशोर घाटगे, अशोक भंडारे, महेश उत्तुरे, विजय सूर्यवंशी, बबन रानगे, आशिष ढवळे, जयकुमार शिंदे, काका पाटील, माणिक पाटील, प्रतिज्ञा उत्तुरे, वैशाली महाडिक, सुभाष जाधव, युवराज पाटील, प्रसाद जाधव, अनिकेत सावंत, फत्तेसिंह जाधव, विवेक कोरडे, रामदास पाटील आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71548 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..