
डॉक्टर तरुणी ठार
31934
डॉ. उमा जरळी
भडगावजवळ कंटेनरच्या
धडकेत डॉक्टर तरुणी ठार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावर भडगावच्या हद्दीत कंटेनरने समोरून दिलेल्या जोरदार धडकेत मोपेडस्वार डॉक्टर तरुणी जागीच ठार झाली. डॉ. उमा मार्तंड जरळी (२६,
रा. मुत्नाळ, ता. गडहिंग्लज) असे मृताचे नाव आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
दरम्यान, भरधाव वेगाने वाहन चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल कंटेनरचालक प्रकाश नाना पाटील (रा. वडजी, ता. भडगाव, जि. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
जरळी कुटुंबीय मुळचे मुत्नाळचे. अलीकडील काही वर्षापासून ते संकेश्वरमध्ये राहतात. डॉ. उमा येथील केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयातून ‘बीएएमएस''ची पदवी प्राप्त केली आहे. महागावच्या संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटलमध्ये तीन महिन्यांपासून ती वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत होती. त्यासाठी ती रोज संकेश्वर ते महागाव असे ये-जा करीत असे.
आज सकाळी ती संकेश्वरहून मोपेडने (एमएच ०९, एफएन- २३९४) महागावकडे जात होती. भडगाव ते हुनगिनहाळ दरम्यान शंकर हिरेकुडे यांच्या शेतासमोर महागावकडून गडहिंग्लजकडे येणाऱ्या कंटेनरने (एमपी ०९, जीजी ७५३८) तिच्या मोपेडला समोरुन धडक दिली. त्यात तिच्या डोक्याला व उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली.
डोक्यातून अतिरक्तस्त्रावामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची फिर्याद भीमाप्पा जरळी यांनी दिली. मृत उमाच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. भारतीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष मार्तंड जरळी व मुत्नाळच्या माजी सरपंच माधवी जरळी यांची ती कन्या होय.
चौकट...
*स्वप्न पूर्ण, काळाचा घाला
वैद्यकीय सेवेची आवड असल्याने उमा डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. आई-वडिलांच्या पाठबळामुळे जिद्दीने तिने डॉक्टरची पदवी घेतली. आज वैद्यकीय सेवेसाठी जातानाच तिच्यावर काळाने घाला घातला. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी आले. त्यावेळी तिचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी आक्रोश केला. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71682 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..