
इचलकरंजी महापालिकेच्या मार्गात अडथळा
इचलकरंजी महापालिकेच्या मार्गात अडथळा
राज्यपातळीवरील घडामोडीची परिणाम ः पालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरूच ः इच्छुक धास्तावले
इचलकरंजी, ता. २६ ः राज्यात सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे इचलकरंजी महापालिका होण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे प्रशासनाकडून पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरूच ठेवली आहे. यामध्ये प्रारुप मतदार याद्या अंतिम करण्यास सुरुवात झाली आहे; पण महापालिका होणार असल्याच्या शक्यतेमुळे या प्रक्रियेकडे इच्छुकांनी कानाडोळा केला. पण सद्यस्थिती पाहता महापालिका झाली नाही तर....अशी चर्चा सुरू झाल्याने इच्छुक धास्तावले आहेत. त्यामुळे त्यांचे राज्य पातळीवरील पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
इचलकरंजी महापालिका करण्याचा विषय सर्वप्रथम विषय खासदार धैर्यशील माने यांनी पुढे आणला. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी विरोध न करता महापालिका करण्यासाठी पालिकेत एकमुखी ठराव केला. तत्पूर्वी, महापालिका करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याची सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. त्यामुळे महापालिका करण्याच्या प्रक्रियेत श्री. शिंदे यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. शासनाकडून महापालिका करण्याबाबत हरकती व सूचना मागवल्या होत्या. त्यामध्ये सात हरकती दाखल झाल्या होत्या. त्यानंतरच्या प्रक्रियेला गती येत असतानाच राज्य पातळीवर शिवसेनेमध्ये झालेल्या अंतर्गत बंडाळीमुळे राज्य सरकार अस्थिर झाले आहे.
या आकस्मिक घडामोडीमुळे इचलकरंजी महापालिका करण्याच्या मार्गात सध्या तरी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पुढील सार्वत्रिक निवडणुका पालिका म्हणून नव्हे तर महापालिका होणार म्हणून अनेक इच्छुकांनी सध्या पालिकेच्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले. किंबहूना इच्छुकांनी सध्या शांत राहणेच पसंत केले. कारण महापालिकेची निवडणूक होण्यास किमान सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असा त्यांच्याकडून सर्वसाधारण अंदाज बांधण्यात आला. त्यामुळे बहुतांशी इच्छुक निवांत झाले होते. पण राज्य पातळीवर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर मात्र इच्छुक धास्तावल्याचे चित्र दिसत आहे. इतर पालिकांप्रमाणे इचलकरंजी पालिकेचीही सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया प्रशासनाने सुरूच ठेवली आहे.
प्रभाग रचना अंतिम झाली आहे. आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदार याद्या अंतिम करण्यात येत आहेत. हरकती व सूचना दाखल झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर पुढे निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे महापालिकेचा विषय बारगळल्यास इतर पालिकांसमवेत इचलकरंजी पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे इच्छुकांची मात्र मोठी गोची होणार असून राजकीय पक्षांच्या नेतेमंडळीनांही मोठी कसरत करावी लागणार आहे. तूर्तास तरी राज्य पातळीवरील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
----------
पालिकेचा निधी अडकला
राज्य शासनाकडे विविध योजनांचे प्रस्ताव दाखल केले होते. हे प्रस्ताव नगरविकास विभागाकडे प्रलंबित आहे. येत्या काही दिवसांत कोट्यवधींचा निधी येणार होता. विशेष करून आरोग्य विभागाला मोठी निधी मिळणार होता. मात्र सद्यस्थीतीतील घडामोडींमुळे हा निधी तुर्तास तरी लटकण्याची चिन्हे आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71763 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..