भोसले सिलिका सॅन्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसले सिलिका सॅन्ड
भोसले सिलिका सॅन्ड

भोसले सिलिका सॅन्ड

sakal_logo
By

उद्योगातून सामाजिक कार्यात अग्रेसर
‘भोसले सिलिका सॅन्डस्’‌


लीड
काही माणसं जन्मजात सधन, श्रीमंतीचा वारसा घेऊन जन्माला येतात, तर काही माणसं प्रतिकूल परिस्थितीवर मात करत खडतर संघर्षातून आपले जीवन घडवितात. परिस्थितीशी दोन हात करत स्वत:च्या आणि व्यावसायिक जीवनात यशाची शिखरे पादाक्रांत करतात. यशाच्या शिखरावर पोहचूनही त्याची कोणतीही हवा डोक्‍यात न ठेवता. स्वकर्तृत्वाने मिळविलेल्या यशात अनेक वंचित, गरीब लोकांना सहभागी करून घेतात. जीवनाच्या खडतर परिस्थितीतून आपल्या ‘भोसले सिलिका सॅन्डस्’‌ या व्यवसायात यशस्वी झालेले उद्योजक, मॅकचे संचालक आणि रोटरी क्‍लब ऑफ कागल ‘एमआयडीसी’चे अध्यक्ष शिवाजी भोसले यांनी आपल्या उद्योगाबरोबरच अनेक गरिब विद्यार्थी, वंचित घटकांना मदतीचा हात देत त्यांच्या जीवनात स्थैर्य निमार्ण केले आहे.


-
शिवाजी किसन भोसले असे या यशस्वी उद्योजकाचे नाव आहे. श्री. भोसले यांचा जन्म राधानगरी-हत्तीमहाल येथे २ जुलै १९७२ रोजी सर्वसामान्य कुटुंबात झाला. वडील एमएसईबी (वीज वितरण) कंपनीत कर्मचारी होते. श्री. भोसले यांनी १२ वीनंतर खासगी ठिकाणी १ वर्षाचा टॅली आणि बेसिक संगणकाचा कोर्स केला आणि त्यानंतर एका खासगी कंपनीत त्यांनी नोकरी पत्करली. कमी पगारात नोकरी सुरू करून करिअरचा श्रीगणेशा सुरू केला. त्यांनी खासगी कंपनीत १८ वर्षे नोकरी केली; पण या पगारात त्यांचे भागेना. काहीतरी वेगळे करायचेच या ध्यासातून त्यांनी नोकरी सोडली आणि कोकणातील फोंडा येथे स्वत:चे हॉटेल सुरू केले. उत्कृष्ट मांसाहारी, शाकाहारी जेवण देत ग्राहकांना हॉटेलिंगद्वारे उत्कृष्ट सेवा दिली. ३ वर्षे हॉटेल व्यवसाय केल्यानंतर या व्यवसायातही स्पर्धा वाढली; पण श्री. भोसले यांच्यातील धडपड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. काय करावे, या विचारातच त्यांचे वर्ष निघून गेले. पुन्हा त्यांनी एक खासगी नोकरी पत्करली. नोकरी करत करतच त्यांनी फौंड्रीसाठी लागणाऱ्या सिलिका सॅन्डस्‌ व्यवसायाचा अभ्यास केला. व्यवसायातील बारकावे समजून घेतले. औद्योगिक क्षेत्राची मागणी, कच्च्या मालाचा पुरवठा याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. ५ वर्षे त्यांनी सिलिका वाळू व्यवसायाचा अभ्यास केला. यातूनच त्यांनी मग कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये स्वत:चा सॅन्डस्‌चा व्यवसाय सुरू केला. नोकरीतील अनुभव यावेळी त्यांना व्यवसायात मोलाचा ठरला. अवघ्या काही वर्षांतच त्यांनी आपल्या व्यवसायाला स्थिरस्थावर केले. अनेक बेरोजगार तरुणांना त्यांनी हाताला काम दिले. सिलिका सॅन्डस्‌ व्यवसायात वेगळे स्थान शिवाजी भोसले यांनी निर्माण केले. सॅन्ड व्यवसायात त्यांनी १७ वर्षे ‘भोसले ब्रॅंड''ने वेगळी ओळख तर निर्माण केलीच; पण या व्यवसायात दर्जातून आणि गुणवत्तेतून त्यांनी दबदबा निर्माण केला आहे. विशेषत: फौन्ड्री व्यवसायात भोसले सॅन्डस्‌ यांचे नाव आदराने घेतले जाते.


शिवाजी भोसले यांचे सामाजिक कार्य
प्रतिकूल परिस्थितीत आणि खडतर संघर्षातून श्री. भोसले यांनी आपल्या व्यवसायात गरूड भरारी मारली. आज ते यशाच्या शिखरावर असले तरी त्यांचे पाय मात्र आजही जमिनीवरच आहेत. ते नेहमी सांगतात, आपण ज्या परिस्थितीतून आलो, त्या परिस्थितीची जाणीव ठेवायला हवी. समाजाचे काहीतरी देणे लागतो याच प्रांजळ भावनेने ते आपल्या व्यवसायातील हिस्सा गरजू, गरीब आणि कामगारांना देतात. त्यांच्याकडे असणाऱ्या अनेक कामगारांना त्यांनी आजारपणात मदत केली आहे. अनेक कामगारांच्या मुलींच्या आणि मुलांच्या लग्नासाठी आर्थिक मदत दिली आहे. कोणत्याही कामगाराच्या घरी कोणताही कार्यक्रम असला तरी ते सढळ हाताने आर्थिक मदत देतात. अनेक कामगारांना घर बांधणीसाठी, घर दुरुस्तीसाठी, शेती सुधारण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत केली आहे.
स्वत:च्या फर्ममधील कामगारांना दरवर्षी ते सहल आयोजित करतात. कामगारांशी ते मैत्रीपूर्ण वागतात.


२०१९ च्या महापुरात
पोहचवले शुद्ध पाणी
२०१९ ला आलेल्या महापुराच्या काळात कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली होती. अशावेळी शिवाजी भोसले यांनी आपल्याद्वारे शहरात शुद्ध पाण्याचे बिस्लेरी जार आणि कॅन असे दोन ट्रक कॅन त्यांनी महापुराच्या काळात पोहोच केले होते. पाण्यामुळे पुणे-बंगरूळ हायवे चार-पाच दिवस बंद होता. अशावेळी हायवेवर थांबलेल्या परराज्यातील, जिल्ह्यातील ट्रकचालक, वाहनधारकांना त्यांनी नाष्टा आणि जेवण पुरविले होते.


शैक्षणिक कार्यासाठी मदत
सामाजिक कार्यात स्वत: मदत तर करतातच; पण शैक्षणिक संस्थांनाही त्यांनी आजवर मदत केली आहे. शिवाजी भोसले रोटरी क्‍लब ऑफ कागलचे अध्यक्ष आहेत. रोटरी क्‍लबच्या माध्यमातून त्यांनी अनेक शाळांना शैक्षणिक साहित्य भेट दिले आहे. कसबा वाळवे (ता. राधानगरी) येथील रघुनाथ स्कूल या शाळेला त्यांनी रोटरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी बेंच, स्कूल बॅग्ज, संगणक, तिजोरी, टेबल आदी साहित्य दिले. व्हन्नूर (ता.कागल) तसेच सांगवडेवाडी (ता. करवीर) येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेला प्रोजेक्‍टर भेट दिला आहे.


शिवाजी भोसले यांची शिवभक्ती
शिवाजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. शिवभक्तीपोटीच गेली ५ वर्षे श्री. भोसले स्वराज्याची जुनी राजधानी असलेल्या राजगड किल्ल्यावर स्वखर्चातून शिवजयंती साजरी करतात. दोन दिवस राजगडावर कुटुंबासह मुक्काम करून पहिल्या दिवशी राजगड परिसराची श्रमदानातून स्वच्छता करतात. गड परिसराची साफसफाई करून शिवजयंती सोहळ्यासाठी सजावट केली जाते. दुसऱ्या दिवशी गडावर पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. गडावरील रहिवाशांना धान्य आदी स्वरूपात मदत वाटप केली जाते. त्यानंतर महाप्रसादाने शिवजयंती सोहळ्याची सांगता होते. तसेच ते साईबाबांचे भक्त आहेत. पाच वर्षे ते शिर्डी साईबाबा मंदिरासाठी देणगी देतात.

कोरोना लॉकडाउन काळात मदत
मार्चपासून कोरोनाच्या लॉकडाउन काळात त्यांनी अनेकांना मोलाची मदत केली आहे. एमआयडीसीतील कारखाने बंद झाल्यानंतर परप्रांतीय मजूर येथे अडकून पडले होते. त्यांना काम नव्हते. अशा वेळी त्यांनी २०० परप्रांतीय असलेल्या बिहार, राजस्थान, ओडिसा, पश्‍चिम बंगाल येथील मजुरांना फूड पॅकेजद्वारे जेवणाची सलग आठवडाभर व्यवस्था केली होती.

भोसले सिलिका सॅन्डस्‌ला
आयएसओ मानांकन
गेली १७ वर्षे शिवाजी भोसले यांच्या भोसले सिलिका सॅन्ड कंपनीला गेल्यावर्षी आयएसओ मानांकन मिळाले आहे. उत्कृष्ट दर्जा आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी आपल्या कंपनीचे स्थान पक्‍के केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71999 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top