
आंदोलन अंकुशतर्फे रास्ता रोको
32170
-----
आंदोलन अंकुशतर्फे रास्ता रोको
प्रोत्साहन अनुदानातील जाचक अटी रद्द न केल्यास टाळे ठोकण्याचा इशारा
शिरोळ, ता. २७ ः महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांच्या अनुदानास, पात्रता अटीतील जाचक अटी रद्द करून सरसकट अनुदान न दिल्यास एक जुलैला येथील सहायक निबंधकाच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिला.
आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको केला. यावेळी अक्षय पाटील, दीपक पाटील आदींनी शासनाच्या प्रोत्साहनपर अनुदानाकरिता घातलेल्या जाचक अटीचा समाचार घेतला. नियमित पीककर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले. तथापि त्यामध्ये असलेल्या काही जाचक अटीमुळे शिरोळ तालुक्यातील पाच टक्के शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार नाही. २०१९ च्या महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. पत राखण्याकरिता शेतकऱ्यांनी उसनवार पैसे घेऊन पीककर्जाची जुनी-नवी प्रकरणे केली आहेत. यामुळे तत्काळ जाचक अटी मागे घ्याव्यात, अशी मागणी केली.
धनाजी चुडमुंगे म्हणाले, ‘शासनाने शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची भूमिका घ्यावी. नोकरशाहीमुळे जाचक अटी परिपत्रकात घातल्या असतील, तर त्या तत्काळ मागे घ्याव्यात. त्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात येत आहे. जाचक अटी मागे न घेतल्यास १ जुलै रोजी येथील सहायक निबंधकाच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल.’
दरम्यान, तहसीलदार सौ. अपर्णा मोरे-धुमाळ यांना याबाबतचे निवेदन दिले. आंदोलन अंकुशचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे, भूषण गंगावणे, अक्षय पाटील, कृष्णा देशमुख, महेश जाधव, धैर्यशील पाटील, शशिकांत काळे, सुनील चुडमुंगे, दीपक माने, अरुण साळोखे आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72012 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..