
राजेश क्षीरसागर विरोधात तक्रार अर्ज
राजेश क्षीरसागर यांच्याविरुद्ध
पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज
कोल्हापूर, ता. २८ ः माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मला सोशल मीडियावरून धमकी दिली आहे. सदर धमकीमुळे माझ्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे क्षीरसगार यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली आहे. यासंबधीचा तक्रार अर्ज त्यांनी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना दिला. सोशल मीडियावरील ही चित्रफित गुवाहटी येथून प्रसारित झाल्याचे त्यांनी अर्जात म्हटले आहे.
पैसे देण्यावरून एकाला मारहाण
आजरा ः विकत घेतलेल्या गायीचे उरलेले पैसे देण्याची मागणी केल्यावर येथे एकाला मारहाण केली. निंगुडगे (ता. आजरा) येथे आज दुपारी अडीचच्या सुमाराला हा प्रकार घडला. आप्पाजी मगदूम (तेरणी, गडहिंग्लज) यांच्यासह तिघा अनोळखींवर आजरा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. शिवराज भैरु मगदूम यांनी फिर्याद दिली आहे. शिवराज मगदूम यांनी आप्पाजी मगदूम यांना गाय विकली होती. त्यांनी आज दुपारी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. यावर आप्पाजीने कुठले पैसे असे म्हणून तीन अनोळखी साथीदारासह कोळप्याच्या दांड्याने शिवराज यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. पुन्हा पैसे मागितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. हवालदार पांडुरंग गुरव अधिक तपास करीत आहेत.
बंद सायझिंगमध्ये चोरी
इचलकरंजी : कबनूर येथील दावतनगर भागातील बंद सायझिंगचे बनावट चावीने कुलूप काढून चोरी झाली. वार्पिंग रुळ, रुळाच्या थाळ्या, विद्युत मोटारीसह २ लाख १५ हजाराचे साहित्य चोरीला गेले आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. येथील सागर मांगलेकर यांची श्री चिंतामणी सायझिंग आहे. २२ जुनपासून ही सायझिंग बंद होती. याचे बनावट चावीने कुलूप चोरट्याने तोडले. ६० हजाराचे ६ वार्पिंग रुळ, १ लाख ८ हजाराच्या रुळाच्या ३६ थाळ्या, ४ विद्युत मोटारी, ४ वार्पिग बिम ब्रॅकेट यासह २ लाख १५ हजाराचे साहित्य लंपास केले. हे साहित्य चोरीला गेल्याचे आज निदर्शनास आले. याप्रकरणी मांगलेकर यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
2571
मोरेवाडीतील एकाला पोलिस कोठडी
कळे : विषारी औषध प्राशन केलेल्या मोरेवाडी (ता. पन्हाळा) येथील जयश्री परशराम मोरे (वय ३०) या महिलेच्या मृत्यूप्रकरणी संशयित आरोपी तिचा पती परशराम निवृत्ती मोरे (वय ३६) याला कळे पोलिसांनी अटक केली. कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सासू, सासरा व पतीच्या मानसिक त्रासाला कंटाळून जयश्रीने विषप्राशन केले होते. कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान जयश्रीने दिलेल्या फिर्यादीनुसार पती परशराम, सासू सावित्री, सासरा निवृत्ती यांच्याविरोधात कळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सोमवारी (ता. २७) दुपारी तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जयश्रीचा पती परशराम याला कळे पोलिसांनी अटक केली होती.
पुनाळ येथे वानरावर अंत्यसंस्कार
पुनाळ : येथील चौकात वीज वाहिनीचा धक्का बसून मृत्यू झालेल्या वानरावर ग्रामस्थांनी अंत्यसंस्कार केले. येथील मुख्य चौकात सायंकाळी सहाच्या सुमारास घटना घडली. सायंकाळी चार ते पाच वानरे दुकाने व घरांवर उड्या मारत होती. कुत्र्याच्या भितीने व माणसांनी हुसकल्याने बिथरलेल्या एका वानराने वीज खांबाचा आधार घेतला. खांबावर चढलेल्या वानराला विजेचा धक्का बसताच तडफडतच ते पडले. आनंदा पाटील, राजाराम तोरस्कर यांनी पुढाकार घेऊन कासारी नदीकाठी नेले. बाजीराव झेंडे, बळवंत चौगले, बाजीराव तोरस्कर, सरदार झेंडे, हर्षवर्धन तोरस्कर, आर्यन पाटील यांच्या मदतीने सर्व विधी करून वानराला दफन केले.
32495
मोबाईल चोरट्यास पकडले
शिरोळ ः नांदणी नाका लमाणी वसाहत येथील चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. विनायक आनंदा भोसले (एस. टी. स्टँड कामगार भवनजवळ, सांगली) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी, लमाणी वसाहत नांदणी नाका येथून १९ फेब्रुवारीला घरातून तीस हजारांचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला होता. याबाबत शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शोध पथकातील प्रदीप कुंभार, ज्ञानेश्वर सानप, ताहीर मुल्ला, गजानन कोष्टी, रहमान शेख यांनी तपास सुरू केला असता विनायक भोसले हा संशयित असल्याचे स्पष्ट झाले होते. मंगळवारी आकाशवाणी सांगली परिसरात भोसले याला पकडले. त्याच्याकडून चोरीतील मोबाईल जप्त केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72298 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..