
मतदार यादीवर हरकतींचा पाऊस
मतदार यादीवर हरकतींचा पाऊस
गडहिंग्लज पालिका निवडणूक; प्रभाग बदलल्याच्या हरकतींचा भरणाच जास्त
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २८ : आगामी गडहिंग्लज नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय मतदार यादीवर अक्षरश: हरकतींचा पाऊस पडला आहे. केवळ सहा दिवसांत ६५७ हरकती दाखल झाल्या आहेत. यात शेवटच्या दिवशी आलेल्या हरकती अधिक आहेत. यामध्ये प्रभाग बदलल्याच्या हरकतींचा अधिक भरणा आहे. विशेषत: दोन्ही प्रभागांच्या सीमेवर असणारी नावे इकडे-तिकडे झाली आहेत. या हरकतींची छाननी आता सुरू होणार आहे.
गडहिंग्लज पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना, आरक्षणाची प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदार यादीचा कार्यक्रम सुरू झाला. २१ जून रोजी शहरातील प्रभागनिहाय मतदारांची प्रारुप यादी जाहीर करण्यात आली. २७ जूनअखेर त्यावर हरकती नोंदवायच्या होत्या. प्रारुप यादीनुसार २९ हजार ९६१ मतदार मतदानासाठी पात्र आहेत. नावे वगळली, डिलीट झाल्याची एकही हरकत नसल्याचे सांगण्यात येते. यामुळे प्रारुप यादीतील मतदारांची संख्या कायम राहण्याची शक्यता आहे.
परंतु, मतदारांचा प्रभाग बदलल्याच्या हरकती अधिक आहेत. मतदार यादी प्रसिद्धीनंतर इच्छुकांकडूनही यादीची छाननी झाली. त्यात अनेकांनी आपल्या हक्काच्या मतदारांचा शोध यादीत घेण्याचा प्रयत्न केला. त्यात बहुतांशी नावे इकडे-तिकडे झाल्याचे लक्षात आले. दरम्यान, अशा संदर्भातील हरकतींचा पाऊस पडला आहे. विशेष करून प्रभागांच्या सीमेवर असणारी नावेच शेजारील प्रभागात घुसले आहेत. अनेक मतदारांचे प्रभाग बदलल्याने प्रशासनावर छाननीचा ताण वाढला आहे.
----------------
चौकट...
स्थळ पाहणी होणार
दाखल झालेल्या हरकतींची छाननी ही स्थळ पाहणीवर अवलंबून राहणार आहे. ज्या मतदाराने प्रभाग बदलल्याचा आक्षेप घेतला आहे, त्या ठिकाणी जावून प्रभागाची हद्द व मतदाराचे नाव तपासून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. उद्यापासून ही स्थळपाहणी होणार असल्याचे समजते. दरम्यान, मतदान केंद्रांचीही तपासणी केली आहे. सर्व हरकतींची छाननी प्रक्रिया पूर्ण करुन १ जुलै रोजी मतदार यादी अंतिम करण्यात येणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72363 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..