
राज्य बॅडमिंटन स्पर्धेसाठी जिल्हा संघ नाहीच
राज्य बॅडमिंटन स्पर्धेसाठी
जिल्ह्याचा संघ नाहीच
सुयोग घाटगे : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : औरंगाबाद येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील राज्य बॅडमिंटन स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन संघ सहभागी होत नाही. ३० जूनपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २५ जूनपर्यंतची मुदत दिली होती; मात्र एन्ट्रीच पाठवली नसल्याने जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू स्पर्धेला मुकले आहेत.
जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन संघटनेच्या कार्यपद्धतीत मरगळ आल्याचे चित्र आहे. कोरोनाचा कालावधी सोडल्यास त्यानंतर कोणत्याच मोठ्या स्पर्धा संघटनेने घेतलेल्या नाहीत. एक स्पर्धा तर स्वतः काही पालकांनी पुढाकार घेऊन पदरमोड करून संघटनेच्या नावाखाली भरवली. एकतर खर्चिक असणारा हा खेळ पाल्याने निवडल्यामुळे तसेच या खेळामध्ये पाल्य निपुण असल्यामुळे त्याच्या भवितव्यासाठी पालक स्वतःच अधिक प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. ३० जून ते ६ जुलै दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघ पाठवण्याची सूचना परिपत्रकाद्वारे १४ जूनलाच संघटनेला केली होती. मात्र, संघ निवड चाचणी घेण्यास दिरंगाई केल्याने २५ तारखेपर्यंत पाठवायची अंतिम संघ यादी पाठवली नाही. अनेक पालकांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र, या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक वेळेला वेगवगेळी कारणे देत निवड चाचणी घेतली नाही, असे पालकांनी सांगितले.
मुंबई येथे झालेल्या स्पर्धेमध्ये काही मोजकेच खेळाडू सहभागी झाले होते. या काही मोजक्या मात्र पदाधिकाऱ्यांच्याच तालमीत तयार होणाऱ्या खेळाडूंसाठी इतर खेळाडूंचे नुकसान करत असल्याची चर्चा पालकांमध्ये आहे.
कोट
२० ते २३ जून दरम्यान मुंबई येथे स्पर्धा सुरू होत्या. यामुळे निवड चाचणी घेणे शक्य नव्हते. सर्व खेळाडू असल्याशिवाय निवड चाचणी घेतल्यास योग्य व गुणवत्तापूर्ण संघ निवडणे शक्य नसते. यासाठीच निवड चाचणी घेणे शक्य झाले नाही.
-तन्मय करमरकर, सचिव, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72607 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..