
ग्रामीणमधील मते शहरात
मनपाच्या यादीत ग्रामपंचायतीतील मतदार
भाजपच्या माजी नगरसेवकांकडून प्रकार उघड; शिंगणापुरातील नावे फुलेवाडीत
कोल्हापूर, ता. २९ ः शहरातील एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागातील यादीत मतदार गेल्याच्या घटना समोर येत असताना आज चक्क ग्रामपंचायत हद्दीतील मतदारांची नावे लगतच्या शहरातील प्रभागात आल्याचे आढळले. शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ४६५ मतदार फुलेवाडीतील प्रभागात आल्याचे माजी महापौर सुनील कदम व माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी प्रशासकांच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे मतदार यादीचा घोळ वाढतच चालला असल्याचे दिसून येत आहे.
एका प्रभागातील मतदार नजीकच्या प्रभागात गेले आहेत. शिवाय काही ठिकाणची नावे नजीकच्या नव्हे, भौगोलिक संलग्नता नसलेल्या प्रभागातही गेल्याच्या तक्रारीही काल काही माजी नगरसेवकांनी बैठकीत केल्या होत्या. त्यानंतर आज वेगळाच प्रकार दिसून आला. सुनील कदम व सत्यजित कदम यांनी आज प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली. यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर उपस्थित होते. यावेळी कदम यांनी शिंगणापूरच्या ग्रामीण हद्दीतील मतदारांची नावे नजीकच्या फुलेवाडीतील प्रभागात आली असून, याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे सांगितले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
चौकट
प्रत्यक्ष मतदार तपासण्याच्या सूचना
विविध पक्षांकडून घेतल्या जात असलेल्या हरकतींमुळे आज उपायुक्त आडसूळ यांनी सहायक आयुक्त, उपशहर अभियंता, सर्व्हेअर, कनिष्ठ अभियंता यांची बैठक घेतली. त्यामध्ये आलेली हरकत मतदाराच्या नावासह प्रत्यक्ष जाऊन तपासा, पंचनामा व जिओ टॅग सादर करा, कोणतीही हरकत स्वीकारा, अशा सूचना आडसूळ यांनी केल्या.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72654 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..