
अद्यापही अनेक दुकानांचे फलक इंग्रजीमध्ये
अद्यापही अनेक दुकानांचे फलक इंग्रजीमध्ये
मराठी नामफलकाच्या इचलकरंजी पालिकेच्या सुचनेकडे कानाडोळा; कारवाईची मागणी
इचलकरंजी, ता.२९ : महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्यपत्र निर्णयानुसार इचलकरंजी परिसरांमधील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत करण्यात यावेत, याबाबत पालिका प्रशासनाने सूचना केल्या होत्या. मात्र शहरातील व्यावसायिकांनी ही सूचना गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. अद्यापही अनेक दुकानांचे फलक इंग्रजीमध्ये आहेत. मराठी भाषेत फलक नसलेल्या दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील मराठी एकीकरण समिती व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासन नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करणार काय, याकडे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र शासन राज्यपत्र २३ मार्च २०१८ च्या निर्णयानुसार राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत लावणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार इचलकरंजी पालिकेकडे नोंदीत असलेल्या १०१ दुकानदार व आस्थापना यांना नामफलक मराठीमध्ये करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यासंबंधी परिपत्रक प्रसिद्ध केले होते. मात्र त्यानंतर पालिका प्रशासनाने दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठीमध्ये केले आहे की नाही, याची पडताळणी केली नाही. त्यामुळे व्यावसायिकांनी राज्य शासनाच्या आदेशाला व पालिका प्रशासनाच्या सुचनांना केराची टोपली दाखविल्याचा आरोप करण्यात येत आहे. मराठी भाषेत फलक नसलेल्या दुकान व आस्थापनांचे कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असे संघटनांच्या वतीने सांगण्यात येत आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या आदेशानुसार दुकानदार वा आस्थापनेचा प्रमुख नामफलक मराठी देवनागरी लिपीमध्ये असावा. इतर भाषेत लिहण्यास परवानगी दिली आहे. मात्र मराठीतील नामफलकावरील अक्षराचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये, असे राजपत्रात नमूद केले आहे.
---
महाराष्ट्र शासन राज्यपत्र शासनाकडून आलेल्या राज्यपत्रामध्ये पालिका क्षेत्रातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत लावण्यात यावेत अशा सूचना केल्या होत्या. त्यांची अमंलबजावणी न करणाऱ्या दुकाने व आस्थापनांवर कारवाई करण्यासंदर्भात आदेश नाही. आदेश मिळाल्यास कारवाई करण्यात येईल.
-सचिन पाटील, मिळकत व्यवस्थापक, इचलकरंजी नगरपरिषद
----
अनेक राज्यात राज्यभाषा व इंग्रजीमध्ये दुकाने, आस्थापनांचे नामफलक लावण्याची परवानगी आहे. मात्र तेथील राज्य भाषेतील नामफलकांच्या अक्षराचा आकार इंग्रजी भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये, असे आदेश आहेत. त्याची अमंलबजावणी ही काटेकोरपणे करण्यात येते. मात्र येथे मराठीसह अन्य भाषेस परवानगी असतानाही अमंलबजावणी होत नाही.
-अमित कुंभार, अध्यक्ष, मराठी एकीकरण समिती
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72692 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..