
हलकर्णी, नूलमध्ये ‘दुबार’ची भिती
32668
खणदाळ : पावसाअभावी हलकर्णी मंडळातील भात पिकाच्या उगवणीवर परिणाम झाला असून, बहुतांशी बियाणे वाया गेल्याचे चित्र आहे.
हलकर्णी, नूलमध्ये ‘दुबार’ची भीती
गडहिंग्लज तालुका; जूनमध्ये सरासरीच्या ३९ टक्केच पाऊस, माळरानावरील पिके धोक्यात
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २९ : गडहिंग्लज तालुक्यात जून महिन्यातील पावसाच्या सरासरीपेक्षा केवळ ३९ टक्केच पाऊस झाला आहे. त्यातही तालुक्यात सात मंडळांचा विचार केला तर हलकर्णी आणि नूल मंडळात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. यापुढचे काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास पहिल्यांदा या मंडळातच दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे.
गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतला तर जूनमधील सरासरी पावसाने ओलांडली होती. जून महिन्यात शंभर टक्के पेरण्या होऊन उगवणही चांगली झाली होती. यंदाही पाऊसमान चांगला असल्याचे हवामान खाते सांगितले असले तरी अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. यामुळे चिंताजनक परिस्थिती तयार झालेली आहे. गडहिंग्लज तालुक्यात जूनमध्ये सरासरी १७९ मि.मी. पाऊस पडतो. मात्र, यंदा जूनच्या शेवटच्या दिवसापर्यंत केवळ ७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुक्यातील मंडलनिहाय पावसाचा आढावा घेतला, तर सर्वात कमी पाऊस हलकर्णी आणि नूल मंडलमध्ये झाला आहे. सर्वाधिक पाऊस कडगाव, त्या खालोखाल गडहिंग्लज मंडलमध्ये झाला आहे. आणखीन काही दिवस पावसाची स्थिती अशीच राहिली, तर विशेष करून हलकर्णी व नूल मंडलमधील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. या भागात पेरण्या झालेल्या क्षेत्रात उगवणही कमकुवत आहे. एकाच क्षेत्रात ठिकठिकाणी बियाणांची उगवण झालेली नाही. जमीन कोरडी झाली असून ती तहानलेली आहे. विशेष करून माळरानातील पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. नेसरी भागातही पाऊस कमी असल्याने रोप लावण खोळंबली आहे. पाणी असेल त्याठिकाणी चिखलगुठ्ठा करून रोपलावण सुरू आहे. रोपलावणीसाठी टाकलेल्या तरवांची स्थिती चांगली असली तरी अपेक्षित पावसाअभावी काहींची लावण थांबली आहे.
पावसाने मारलेल्या दडीमुळे खरीप पिके संकटात आली आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने १५ जूनपर्यंत २५ टक्के पेरण्या झाल्या. ही पिके उगवली आणि पुन्हा एकदा पावसाने दडी मारली. कडक ऊन पडत असल्याने सिंचन व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी पाणी देऊन कशीबशी पिके जगवली. त्यानंतर गेल्या आठवड्यात तीन-चार दिवस बऱ्यापैकी पाऊस झाला. माळरानावरील पिकांना जीवदान मिळाले. उर्वरित पेरण्या शेतकऱ्यांनी उरकून घेतल्या. या पावसाच्या ओलीतून पिकांची उगवणही झाली आहे. आता पुन्हा दोन दिवसापासून ऊन पडत आहे. परिणामी, शेतकऱ्यांसमोरील चिंतेचे ढग कायम आहेत.
--------------------
चौकट
मंडलनिहाय जूनमध्ये झालेला पाऊस व टक्केवारी
मंडलचे नाव*सरासरी पाऊस मि.मी.*टक्केवारी*पावसाचे दिवस
गडहिंग्लज*९७.५*५४.३*७
कडगाव*१२८.९*७२.६०*८
दुंडगे*७०.८*४०.२०*५
हलकर्णी*२७.४*१५.४०*४
नूल*४४.१*२४.५*७
महागाव*६६.३०*३६.९०*६
नेसरी*५६.९०*३१.७०*८
----------------
दृष्टिक्षेप
- तालुक्याची जूनमधील सरासरी : १७९ मि.मी.
- २९ जूनअखेर झालेला सरासरी पाऊस : ७०.६० मि.मी.
- सरासरी टक्केवारी : ३९ टक्के
-----------------
कोट
गडहिंग्लज तालुक्यात खरीप पीक परिस्थिती चांगली आहे. नूल आणि हलकर्णी मंडळमध्ये पाऊस अंत्यत कमी झाला आहे. त्याचा पिकांच्या उगवणीवर परिणाम दिसत आहे. दुबार पेरणीची स्थिती सध्या तरी दिसत नाही.
- अनिल फोंडे, तालुका कृषी अधिकारी
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72739 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..