महाडीक-पाटील संघर्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाडीक-पाटील संघर्ष
महाडीक-पाटील संघर्ष

महाडीक-पाटील संघर्ष

sakal_logo
By

महाडिक-पाटील संघर्षाला येणार धार
राज्यात सत्ताबदलाचा परिणाम; एकमेकांना रोखण्याचा होणार प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः राज्यात अचानक झालेले सत्तांतर, पराभवाची मालिकाच पचवत अलीकडेच माजी खासदार धनंजय महाडिक यांचा राज्यसभेत झालेला विजय आणि जिल्ह्यातील बंडखोर शिवसेना नेत्यांची भाजपला मिळालेली साथ यामुळे महाडिक गटाला बळ मिळाले असून भविष्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील व महाडिक यांच्यातील संघर्षाला अधिक धार येणार आहे.
जिल्ह्यात १५ वर्षांपासून महाडिक विरुद्ध पाटील असा संघर्ष सुरू आहे. एकेकाळी विधान परिषद, लोकसभा, जिल्हा परिषद आणि विधानसभेतही महाडिक गटाचे वर्चस्व होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार अमल महाडिक यांनीच श्री. पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर जिल्हा परिषदेतही महाडिक यांच्या रूपाने भाजपची सत्ता आली; पण त्यानंतर दोन वर्षातच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत श्री. पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचा पराभव करून आपल्या पराभवाचा बदला घेतला. त्यानंतर महाडिक यांची जिल्हा परिषदेतील सत्ता गेली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘आमचं ठरलंय’ म्हणत धनंजय हे आघाडीचे उमेदवार असूनही श्री. पाटील यांनी त्यांच्या पराभवात सिंहाचा वाटा उचलला. त्याचवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्री. पाटील यांनी पुतणे ऋतुराज यांना मैदानात उतरवून अमल यांचा पराभव केला. ‘गोकुळ’ हे महाडिक यांचे अर्थिक सत्ता केंद्र तेही गेल्यावर्षी श्री. पाटील यांनी ताब्यात घेतले. उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार सत्यजित कदम यांचा पराभव करून महाडिक गटाला श्री. पाटील यांनी नामोहरम केले.
सलगच्या पराभवामुळे काही अंशी ‘बॅकफूट’ गेलेल्या महाडिक गटाला धनंजय यांच्या राज्यसभेतील विजयाने थोडी ताकद मिळाली. या विजयाचे जोरदार ‘सेलिब्रेशन’ करून श्री. महाडिक यांनीही आगामी राजकारणात हा संघर्ष कायम राहील याची झलक दाखवली. तोपर्यंत राज्यातील आघाडी सरकार बरखास्त होऊन भाजप व शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्याने महाडिक गटाला अधिक बळ मिळाले. जिल्ह्यात भाजप म्हणजे महाडिक आणि महाडिक म्हणजे भाजप अशी स्थिती आहे. त्याला बळ देण्याचे काम भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी केले आहे. त्यातून भविष्यात महाडिक-पाटील संघर्ष अधिक तीव्र होईल. त्याची सुरूवात महापालिकेतून होईल, जिल्हा परिषदेतही या दोन गटासह राष्ट्रवादीसोबत भाजपचा सामना आहे. तिथेही महाडिक गटाची ताकद त्यांना उपयोगी पडणार आहे. भाजपची सत्ता आणि स्वतःची ताकद या जोरावर श्री. महाडिक प्रत्येक हिशेब चुकता करण्याचा प्रयत्न करतील.

पहिले लक्ष्य ‘गोकुळ’
राज्यात आणि जिल्ह्यात घडलेल्या अलीकडच्या राजकीय उलथापालथीत महाडिक गटाचे पहिले लक्ष हे ‘गोकुळ’ असणार आहे. संघात सध्या आमदार आबिटकर गटाचे दोन, चंद्रदीप नरकेंचे दोन तर महाडिक यांचे चार संचालक आहेत. अध्यक्ष विश्‍वास पाटील हे पूर्वीचे महाडिक यांचे कट्टर समर्थक; पण ऐनवेळी त्यांनी श्री. पाटील यांना साथ दिले. विश्‍वास पाटील यांनाच ‘टार्गेट’ करून ‘गोकुळ’मध्ये घुसण्याचा प्रयत्न महाडिक यांचा असेल; पण त्याचवेळी सतेज पाटील हेही काँग्रेसचे ताकदवान नेते आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात त्यांचा संपर्क आहे. महाडिक यांच्या तुलनेत त्यांच्याविषयी फारसे वाईट कोण बोलत नाही, या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

क्षीरसागरांची मिळणार साथ
या संपूर्ण राजकारणात बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मिळालेले उत्तरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची साथ महाडिक गटाला मिळण्याची शक्यता आहे. क्षीरसागर २००९ व २०१४ अशा दोनवेळी आमदार झाले, त्यांच्या या दोन्ही विजयात सतेज यांची भूमिका निर्णायक ठरली होती. २०१९ मध्ये श्री. क्षीरसागर यांच्या पराभवालाही तेच जबाबदार असल्याचा आरोप स्वतः क्षीरसागर यांनी केला होता. त्यातून सतेज विरोधातील महाडिक यांना क्षीरसागर यांची साथ मिळू शकते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72978 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top