रिपोर्ताज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिपोर्ताज
रिपोर्ताज

रिपोर्ताज

sakal_logo
By

लोगो ः ग्राऊंड रिर्पोट
लुमाकांत नलवडे

33070
32952

शिस्तीच्या कामाला
उजाड छताचा बट्टा!

समाजकल्याण आणि जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाचे चित्र

रोज बातमी हवी असेल, तर समाजकल्याण आणि जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालय ठरलेले असे. मात्र, आता तेथील कामाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. कामाबाबत तेथे शिस्त दिसली. जातपडताळणी कार्यालयात पूर्वी तीन जिल्ह्यांचे कामकाज चालत असे. अपुरे कर्मचारी, नियोजनातील गोंधळ, वाढलेल्या कामामुळे कोणताही कागद वेळेत मिळत नसे; मात्र आता कामाचे विभाजन होऊन केवळ जिल्ह्याचेच काम येथे चालते. त्यामुळे दोन दिवसांत दाखले हातात पडतात. जातपडताळणी समिती अध्यक्षांकडे जरी अतिरिक्त कार्यभार असला तरीही ते आठवड्यातून एक दिवस येऊन काम संपवतात, हे सुखावणारे चित्र एकीकडे, तर दुसरीकडे येथील मुख्य सभागृहाचे छत उजाड बनल्याचे आणि पत्रे निघाल्याचे दिसते. त्याकडे प्रशासनाने पाहण्याची आवश्‍यकता आहे.

मध्यवर्ती बसस्थानकापासून १० मिनिटांच्या अंतरावरील समाजकल्याण आणि जातपडताळणीची सरकारी कार्यालये चर्चेत असतात. स्टेशन रोडवरून लिशा चौकातून विचारे माळ परिसरात बाबर हॉस्पिटलच्या रस्त्यावरून डाव्या बाजूला वळण घेत जाताना सेतू आणि ग्राफिक्सची छोटी-छोटी दुकाने दिसू लागली आणि समाजकल्याण आणि जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालय. डाव्या बाजूला वळण घेताच समोर गोल घुमटसारखे असलेले सभागृह नजरेस पडले. आजूबाजूला झाडी आहे. प्रशस्त परिसर आहे. स्वच्छताही आहे; पण सभागृहावरील भाग मात्र उजाड बनला असून, पत्रे फाटलेले आहेत.

..चर्चा...आणि बातमीचा विषय
कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीनही जिल्ह्यांतील जातपडताळणी प्रमाणपत्र देण्याचे विभागीय कार्यालय येथे होते. त्यावेळी तीनही जिल्ह्यांतील विद्यार्थी, पालक आणि सरकारी यंत्रणांसाठी हेच ठिकाण आधार होते. सरकारी कर्मचाऱ्यांना पडताळणी प्रमाणपत्र सक्तीचे केल्यानंतर पडताळणी कार्यालयात होणारी गर्दी नेहमीच चर्चेचा आणि बातमीचा विषय बनली. हेच सभागृह आज भग्नावस्थेत दिसते. सभागृहाचे छतच फाटलेले असल्यामुळे सभागृहातील सर्वच खुर्च्या, फर्निचर तेथून हलविले आहे. समाजकल्याण आणि जातपडताळणी विभागाच्या इमारतीत पार्किंगच्या ठिकाणी हे फर्निचर ठेवले आहे; प्लास्टिक कागदामध्ये ते गुंडाळेले आहे. तसेच राहिल्यास ते खराब होऊ शकते.

पार्किंग ठीक, सभागृहाची दुरवस्था
येथे कार्यालयात कामासाठी येणारी प्रत्येक व्यक्ती योग्य ठिकाणी वाहन पार्किंग करीत असल्याचे दिसून आले. कोणी आगाऊपणा केलाच, तर तेथे असलेले पहारेकरी त्यांना शिस्त लावत असल्याचेही दिसले. इमारतीच्या प्रवेशद्वारसमोरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि त्यांनी लिहिलेली राज्यघटना दिसते. अनेक जण त्याचे वाचन करीतच पायऱ्या चढत असल्याचे दिसून आले. पहिल्या मजल्यावर समाज कल्याण विभागाचे कार्यालय आहे. समाज कल्याण अधिकारी विशाल लोंढे सध्या तेथे कार्यरत आहेत. त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न होता; मात्र ते रजेवर असल्यामुळे भेट होऊ शकली नाही. त्यामुळे सभागृहाच्या दूरवस्थेबाबत माहिती घेता आली नाही.

शिस्त आणि व्यवस्था चोख...
दुसरा मजला गाठला. तेथे जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय आहे. येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्षांकडेसुद्धा कोल्हापुरातील अतिरिक्त कार्यभार असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याकडे सोलापूर आणि कोल्हापूर दोन्ही जिल्हे असल्याने ते आठवड्यातून एक किंवा दोन दिवस कोल्हापुरात येत असल्याचे सांगण्यात आले. पडताळणी कार्यालयात येणारे विद्यार्थी आणि पालकांच्या बैठकीची व्यवस्था केली आहे. याच ठिकाणी एखाद्या बॅंकेत चलन भरण्यासाठी ज्या पद्धतीने व्यवस्था असते, तशी व्यवस्था केल्याचे दिसले. त्यामुळे कार्यालयात एक प्रकारची शिस्त दिसत होती. जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातील समितीत सदस्य, सदस्य सचिव आणि अध्यक्ष असे तीन प्रमुख अधिकारी आहेत. पडताळणी प्रमाणपत्रावर या तिन्ही अधिकाऱ्यांच्या सह्या असतात. न्यायालयाचा दर्जा या समितीला आहे, असा फलक सर्वांना दिसेल, अशा पद्धतीने कार्यालयात लावला आहे. सुनावणी कक्ष स्वतंत्र आहे. पडताळणी करण्यासाठीची कागदपत्रे किंवा त्रुटींबाबत सुनावण्या या कक्षात घेतल्या जातात. काही प्रमाणपत्रांमध्ये कागदपत्रे आणि पुराव्यांची शहानिशा करणे आवश्यक वाटल्यास ‘दक्षता समिती’ म्हणून स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसून आले. या ठिकाणी पोलिस उपाधीक्षक यांच्यासह अन्य अधिकारी आहेत. या दक्षता समितीच्या शेजारी कायदेशीर सल्लागार म्हणून सुद्धा आहेत.

अद्ययावत रेकॉर्ड रूम...पाणी तेवढे नाही
जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय रेकॉर्ड ठेवण्याची प्रक्रिया आदर्श घेण्यासारखी आहे. या रेकॉर्ड रूममध्ये संगणकावर एक कर्मचारी काम करत होता. कार्यालयाच्या समोरील रिकाम्या जागेमध्ये कार्यालयात येणाऱ्यांनी कोणती दक्षता घ्यावी, याची माहिती असणारे फलक दिसले. अर्जदारांनी स्वतःचा ईमेल आयडी द्यावा, यासाठी सेतू कार्यालयातील कर्मचारी किंवा टपरीवरील एजंटांचा ई-मेल आणि पासवर्ड देऊ नये, अशी सक्त सूचनाही दिसली. येथे येणारे विद्यार्थी आणि पालकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मात्र दिसली नाही. कार्यालयाच्या पार्किंगमध्येच असलेल्या टपरीवरच पाणी आणि चहा मिळतो.

ऑनलाईन कामाने वेग वाढला...
सर्व कार्यालय फिरून पाहिल्यानंतर जतपडताळणी कार्यालयातील काही अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर दाखले देण्याची प्रक्रिया वेगवान असल्याचे आकडेवारीसह दाखवून दिले. सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्यास तीन दिवसांत जातपडताळणी प्रमाणपत्र दिले जात असल्याची उदाहरणेही त्यांनी दिली. पूर्वी कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांतील कामकाज येथे चालत असे. त्यावेळी मोठी गर्दी, अपुरे कर्मचारी आणि कामातील विसंगती समोर येत होती. आता सर्व प्रक्रिया ऑनलाइन झाली आहे आणि सांगली व साताऱ्यात स्वतंत्र कार्यालय उघडल्यामुळे येथील गर्दी आणि प्रलंबित दाखलेही कमी झाले आहेत. येथे कामे पूर्ण करून देण्याचा वेग वाढल्याचे सुनावणी दरम्यान आलेल्या काही पालक आणि विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले.
दाखल्यासाठी कागदपत्रे नोंदणी करून घेण्यासाठीहीचे कामही शिस्तीत लागू शकते...याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे कार्यालय आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73121 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..