चंदगडला दिड कोटीच्या विकासकामांना विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगडला दिड कोटीच्या विकासकामांना विरोध
चंदगडला दिड कोटीच्या विकासकामांना विरोध

चंदगडला दिड कोटीच्या विकासकामांना विरोध

sakal_logo
By

चंदगडला दिड कोटीच्या कामांना विरोध
नगरपंचायत सभा; १७ पैकी १५ नगरसेवकांचा हात उंचावून पाठिंबा
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १ ः येथील नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केलेली कामे डावलून त्यामध्ये परस्पर एक कोटी ५१ लाखाची आपल्या मर्जीतील कामे समाविष्ठ करणाऱ्यांना सर्वसाधारण सभेनेच चपराक दिली. या मुद्यावर झालेल्या मतदानावर सतरा पैकी १५ नगरसेवकांनी हात उंचावून विरोध केला. परस्पर समाविष्ठ केलेल्या कामांना मंजूरी देऊ नये, असा ठराव झाला. नगराध्यक्षा प्राची काणेकर अध्यक्षस्थानी होत्या.
नगरपंचायतीच्या मागील सर्वसाधारण सभेत मंजूर केलेली काही कामे वगळून परस्पर दुसरीच एक कोटी ५१ लाखाची कामे घुसविली. त्याला शासनाने मंजूरीही दिली. असे असेल तर सर्वसाधारण सभेचे महत्व काय राहते असा प्रश्‍न नगराध्यक्षा काणेकर यांनी केला. हा प्रकार चुकीचा असल्याची प्रतिक्रीया उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला यांच्यासह अन्य सदस्यांनीही व्यक्त केली. त्यावर मतदान घेण्याचे ठरले. सतरापैकी १५ नगरसेवकांनी हात उंचावून या प्रकाराला विरोध दर्शवला. मनमानीपध्दतीने घुसवलेली कामे वगळून नगरपंचायतीने ठरवून दिलेली कामे प्राधान्यक्रमाने करावी, असा निर्णय झाला. हेरे मार्गाला जोडणाऱ्या बायपास रस्त्याच्या दर्जावरुनही जोरदार चर्चा झाली. रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहे. बाजू पट्ट्या व्यवस्थित नाहीत. गटारामध्ये साडंपाणी साचून रहात असल्याकडे उपनगराध्यक्ष मुल्ला यांनी लक्ष वेधले. चार दिवसात गटारांची दुरुस्ती न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा दिला. चंदगड फाट्यापर्यंतच्या मोरींचे काम कधी पूर्ण होणार असाही प्रश्‍न करण्यात आला. त्यावर पंधरा दिवसात हे काम पूर्ण करुन रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल, असे आश्‍वासन अभियंता यड्रावी यांनी दिले. कचरा वाहतुकीच्या कामाला मुदतवाढ, बाबा गार्डन सुशोभिकरण, फॉगिंग मशीन खरेदी आदी विषयांवर चर्चा झाली. नगरसेवक शिवानंद हुंबरवाडी, सचिन नेसरीकर, बाळासाहेब हळदणकर, संजीवनी चंदगडकर, दिलीप चंदगडकर, रोहीत वाटंगी, मेहताब नाईक, नेत्रदीपा बळे, संजना कोकरेकर, प्रमिला गावडे, नूरजहॉं नाईकवाडी, झाकीर नाईक, अनिता परीट, माधुरी कुंभार, मुमताजबी मदार, अनुसया दाणी, नगरअभियंता सुहास पोतदार यांनी सहभाग घेतला. प्रीती बल्लाळ यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.
-----------------
चौकट
महावितरणवर चर्चा
महावितरणकडून शहरातील नागरी वस्तीतून उच्च दाबाची वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु त्यासाठी नगरपंचायतीची ना हरकत घेतली नसल्याबाबत नगरसेवक विजय कडूकर यांनी अभियंता विशाल लोधी यांच्याकडे विचारणा करण्यात आली. नागरीकांचे नुकसान झाल्यास महावितरण जबाबदार राहिल, असा इशारा देण्यात आला. या कंपनीकडून सुमारे चार लाख रुपये घरपट्टी थकीत आहे ती त्वरीत भरावी, अशी मागणी करण्यात आली. ते प्रथम भरावे त्यानंतरच पथदिव्यांचे वीज बिल टप्याटप्याने भरू, अशी भूमिका काणेकर व मुल्ला यांनी घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73197 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..