
प्लास्टीकबंदी झाली पण पुढे काय ?
जुन्या साड्या द्या; कापडी पिशव्या घ्या!
-
कोल्हापूर अर्थ वॉरिअर ग्रुपचे आवाहन
नंदिनी नरेवाडी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः प्लास्टिकच्या वापरावर बंदीची अंमलबजावणी झाली; मात्र प्लास्टिकला पर्याय काय, असा प्रश्न जनसामान्यांसोबतच छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना पडला. हाच प्रश्न सोडविण्यासाठी कोल्हापूर अर्थ वॉरिअरने पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षीपासून वटपौर्णिमेनिमित्त ओटी धरणीमातेच्या या उपक्रमातून आजपर्यंत पाच डझन जुन्या साड्या जमवून त्यातून जवळपास तीस डझन कापडी पिशव्या शिवून वितरित केल्या आहेत. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून, व्यापारी, विक्रेते यांच्यासह घरगुती स्तरावरही पिशव्यांची मागणी वाढत आहे.
प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण पाहता आजपासून सिंगल युज प्लास्टिक बंद होणार, त्यामुळे विक्रेता व ग्राहकांनी कापडी पिशव्याच वापरल्या पाहिजेत हे मान्य केले; मात्र प्लास्टिक ज्या पद्धतीने कमी किमतीत मिळत होते, त्या किमतीत कापडी पिशव्या मिळणे अशक्य होते. ही बाब जाणून जुन्या वापरात नसलेल्या साड्या देण्याचे आवाहन अर्थ वॉरिअरने केले. याला पर्यावरणप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला. काही दिवसांमध्येच साड्या गोळा झाल्या. त्या गरजू महिलांना देऊन पिशव्या शिवण्याचे काम दिले. केवळ ३६ रुपये डझन इतक्या माफक दराने या पिशव्या विक्रेत्यांसह ग्राहकांनाही उपलब्ध करून दिल्या. कोल्हापूर अर्थ वॉरिअरकडे आता पंचवीसशे ते तीन हजार पिशव्यांची मागणी आली आहे. यामध्ये घरगुती वापरासह विक्रेत्यांकडूनही बेकरी प्रॉडक्ट, मेडिकल तसेच कापड विक्रेते यांच्याकडूनही मागणी आहे. त्यामुळे प्लास्टिक कचरामुक्त कोल्हापूरच्या प्रयत्नांना बळ मिळत आहे.
या अभियानात वर्षभर अर्थ वॉरिअरचे सुबोध भिंगार्डे, आशिष कोंगळेकर, तात्या गोवावाला, परितोष उरकुडे, सुहास नाईक, तृप्ती देशपांडे, सुप्रिया भस्मे, स्मिता देशमुख, रमा गायकवाड, वर्षा वायचळ, अपर्णा खिरे आणि टीम कार्यरत आहे.
-
चौकट
यांच्याकडे जमा करा जुन्या साड्या
* सुप्रिया भस्मे - कसबा बावडा, रमणमळा परिसर.
* आशिष कोंगळेकर - गंगावेस, शुक्रवार पेठ परिसर.
* रमा गायकवाड - रुईकर कॉलनी, मुक्त सैनिक परिसर.
* तृप्ती देशपांडे - मोरेवाडी, राजेंद्र नगर, जरग नगर परिसर.
* संगीता कोकितकर - एसटी स्टँड, ताराबाई पार्क परिसर.
* रोहिणी पाटील - शाहूपुरी, राजारामपुरी.
कोट
अर्थ वॉरिअरतर्फे वापरात नसलेल्या साड्या जमवून त्यापासून कापडी पिशव्या शिवून अत्यल्प किमतीत विक्रेत्यांना दिल्या जात आहेत. या उपक्रमाला बळ म्हणून वापरात नसलेल्या साड्या अर्थ वॉरिअरच्या सदस्यांना देऊन या उपक्रमाला बळ द्यावे.
- तृप्ती देशपांडे, सदस्या, अर्थ वॉरिअर.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73249 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..