
खेल के सिकंदर
लोगो- खेल के सिकंदर भाग चार
---
३३०९८
--
पोलिस हॉकी संघाचे ‘गोल्डन वर्क’
परिक्षेत्रीय स्पर्धेत सलग नऊ वर्षे सुवर्ण; जिल्हासह परराज्यातही उमटवला ठसा
राजेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः हॉकी पंढरी अशी कसबा बावड्याची ओळख. इथल्या हॉकी खेळाडूंत टॅलेंटची कमतरता बिलकूल नाही. हेच खेळाडू पोलिस दलात भरती झाले आणि सलग नऊ वर्षे कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत ‘गोल्ड मेडल’चे मानकरी ठरले. कोल्हापूर शहर फुटबॉल वेडे म्हणून ओळखले जात असताना पोलिस दलातील खेळाडूंनी मात्र हॉकीतील कौशल्याची चुणूक दाखवली आहे.
हॉकी खेळाच्या माध्यमातून अनेक खेळाडू पोलिस भरती झाले. कसबा बावडा येथे दरवर्षी होणाऱ्या विविध स्पर्धांमुळे या भागात हा खेळ अत्यंत लोकप्रिय आहे. याच भागात पोलिस अधीक्षक कार्यालय, मुख्यालयाचा भाग येतो. त्यामुळे येथील पोलिसांच्या घराघरात हॉकी स्टिक हमखास पहावयास मिळते. लहानपणी हाती घेतलेली हॉकी स्टिक पोलिस दलात रुजू झाल्यानंतरही खेळाडूंनी हातातून सुटू दिली नाही. पोलिस म्हटलं की दररोजच्या कामाचा ताण, बंदोबस्त आलाच. यातून मिळेल त्या वेळी खेळाडू पोलिस मैदानावर तासभर तरी सराव करतात. प्रत्येक स्पर्धेत खेळाडूंनी दाखविलेल्या कौशल्यामुळे राज्यात कोल्हापूर पोलिस हॉकी संघाचा दबदबा कायम आहे.
कोरोना संकटामुळे हे खेळाडू अडीच वर्षे मैदानापासून दूर राहिले; पण गेल्या तीन महिन्यात पुन्हा हातात स्टिक घेऊन त्यांनी जोमाने सराव करण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर पोलिस हॉकी संघाचे नाव देशभरात पोहचवायचे यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. या संघाचे प्रतिनिधित्व प्रशांत काटकर, संदीप सावंत, विक्रम पाटील, आयुब पेढारी, मुकुंद रजपूत, सागर कांडगावे, सत्यजित सावंत, मिलिंद मालाई, मोहन गवळी, आसिम महात, विनोद मनुगडे, विनायक गुरव, हेमंत जाधव, अमर पाटील, अमित शिपुरे, श्रीधर जाधव, सिद्धेश्वर सुतार हे करत आहेत. या संघातील आठ खेळाडू ऑल इंडिया पोलिस क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र पोलिस हॉकी संघाचे प्रतिनिधित्वही करतात. इजाज शेख हे प्रशिक्षकाची धुरा सांभाळत आहेत.
चौकट
कोल्हापूर पोलिस हॉकी संघाची झेप...
२०१० ते २०१८ अखेर
परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा - नऊ वर्षे सुवर्ण पदक
राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा - चार सुवर्ण, दोन रौप्य, एक कास्य
-------
चौकट
४० वर्षांनंतर पदक...
२०१६ मध्ये झालेल्या अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र पोलिस संघात कोल्हापूर पोलिस हॉकी संघातील सहा खेळाडूंचा समावेश होता. या संघाने ४० वर्षांनंतर रौप्यपदक मिळवले होते. तसेच उत्तराखंड येथे २०१९ मध्ये झालेल्या उजाला हॉकी गोल्ड कप स्पर्धेत कोल्हापूर संघाने तिसरा क्रमांक आणि शिस्तबद्ध खेळाचे बक्षीस मिळवले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73377 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..