अननसाची आवक वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अननसाची आवक वाढली
अननसाची आवक वाढली

अननसाची आवक वाढली

sakal_logo
By

33353
गडहिंग्लज : फळबाजारात अननसाची आवक वाढली असून खरेदी करताना ग्राहक. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)

अननसाची आवक वाढली
बटाटा तेजीत; कांद्याचा दर स्थिर, पालेभाज्यांचा दर पूर्वपदावर
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : येथील फळबाजारात कर्नाटकातून अननसाची आवक वाढली आहे. भाजी मंडईत बटाटा तेजीत असून लसणाचा दर उतरलेलाच आहे. कांद्याचा दर स्थिर आहे. गेले दोन महिने कडाडलेल्या पालेभाज्यांचे दर आवक वाढू लागल्यामुळे हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. जनावरांच्या बाजारात समाधानकारक पावसाअभावी अद्यापही उलाढाल मंदावलेलीच आहे.
फळबाजारात उन्हाळ्यात सर्वच फळांची आवक कमी झाली होती. त्यात केवळ आंब्याची आवक गेले तीन महिन्यांपासून अधिक होती. स्थानिक आंब्याची आवकही आता जेमतेम सुरू आहे. तोतापुरी आणि अननसाची कर्नाटकातून आवक वाढली आहे. त्यामुळे फळबाजारात बघेल तिकडे अननस आणि तोतापुरीचे चित्र आहे. नगानुसार १५ ते ४० रुपयांपर्यंत दर आहेत. सफरचंदाचे दर जास्त आहेत. किलोचा १५० ते २०० रुपये असा आहे. केळी ३० ते ५० रुपये डझन आहेत. चंडगड, आजरा परिसरातून फणसाची आवक कायम आहे.
बटाट्याचे दर तेजीत असून क्विंटलचा दर २२०० ते २५००, तर किरकोळ बाजारात ३० ते ३५ रुपये किलो असा दर आहे. क्विंटलमागे २०० रुपयांनी दर वधारल्याचे व्यापारी अमर नेवडे यांनी सांगितले. कांद्याचा दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असून १५ ते २५ रुपये किलो असा दर आहे. महिन्याभरापासून लसणाचे दर उतरलेलेच आहेत. किलोला २५ ते ७० रुपयांपर्यंत दर आहे. बाजारातील सध्याची लसणाची प्रत खराब असल्यानेच दर उतरल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
मागणी अधिक आणि आवक कमी यामुळे पालेभाज्यांचे गेले काही महिने विक्रमी दर वाढले होते. तिपटीने झालेली ही वाढ आता कमी होऊ लागली आहे. मेथी, पालक, लालभाजी, कांदापात, भोपळा, शेवगा यांच्या पेंढीचा दर १० ते १५ रुपयांवर आला आहे. समाधानकारक पाऊस सुरू झाल्यास अजूनही दर उतरण्याची शक्यता भाजीपाल विक्रेते स्वप्निल डोमणे यांनी व्यक्त केली. जनावरांच्या बाजारात म्हशी, शेळ्या-मेंढ्याची आवक कमी असून मागणीही रोडावली आहे. सरासरी पन्नास टक्के आवक झाल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. हिरवा चारा उपलब्ध झाल्यावरच मागणी वाढून व्यवहार वाढू शकतील, असे विक्रेते अरविंद पाटील यांनी सांगितले.
-----------
चौकट...
माशांची आवक घटली
मटण मार्केटमध्ये समुद्री माशांची आवक घटली आहे. त्यामुळे दर तेजीत आहेत. स्थानिक नदी, तलाव यांच्याही माशांची आवक कायम आहे. विविध जातींच्या माशांचे दर १५० पासून ६०० रुपये किलोपर्यंत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73723 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..