आखाड्यात भाजपचा शड्डू घुमणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आखाड्यात भाजपचा शड्डू घुमणार
आखाड्यात भाजपचा शड्डू घुमणार

आखाड्यात भाजपचा शड्डू घुमणार

sakal_logo
By

33427
हसन मुश्रीफ, श्रीपतराव शिंदे, समरजित घाटगे

आखाड्यात भाजपचा शड्डू घुमणार
गडहिंग्लज पालिका निवडणूक; ‘महाविकास’च्या बांधणीकडेही लागले लक्ष
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : राज्यातील सत्तेमुळे भाजपचे कार्यकर्ते चार्ज झाले आहेत. यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात भाजपचा शड्डू घुमणार आहे. दुसऱ्या बाजूला राज्याची सत्ता गमावल्याच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक पातळीवरील निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बांधणीकडेही राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष राहणार आहे. राज्यातील राजकीय घडामोडींपासून लांब असलेला जनता दल मात्र सध्या तरी नेहमीप्रमाणे ‘एकला चलो’च्या भूमिकेत आहे. राज्यातील सत्ता बदलाचा परिणाम पालिका निवडणुकीवरही होणार असल्याचे संकेतही मिळत आहेत.
गडहिंग्लज शहर कागल मतदारसंघात येते. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे गडहिंग्लजकरांच्या संपर्कात आहेत. विधानसभा निवडणूक लढवून त्यांनी या भागातील आपली लिटमस टेस्ट घेतली आहे. गेल्या अडीच वर्षात त्यांनी संपर्कात खंड पडू दिलेला नाही. त्यात आता राज्यसभा निवडणुकीत माजी खासदार धनंजय महाडिक भाजपतून निवडून आलेत. आगामी वाटचालीत घाटगेंना महाडिकांची साथ मिळणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सोबतीला आहेतच. राज्यात आता शिंदे गट व भाजपची सत्ता आली आहे. यामुळे कार्यकर्ते चार्ज झाले आहेत. सुरूवातीपासूनच पालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याची घोषणा घाटगेंनी केली आहे. आता ही घोषणा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी घाटगेंना आणखीन बळ मिळाले आहे. म्हणूनच पालिकेच्या आखाड्यात भाजपचा शड्डू घुमण्याचे संकेत आहेत.
दुसरीकडे, महाविकास आघाडीची बांधणी करून निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केली आहे. अलीकडील पंधरा दिवसातील घडामोडीने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे. यामुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थतेचे चित्र लक्षात घेऊन भविष्यातील निवडणुकांसाठी त्यांना चार्ज करण्याचे प्रयत्न नेत्यांकडून सुरू आहेत. स्थानिक शिवसैनिकांचे बळ उद्धव ठाकरेंनाच आहे. शिवाय ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीर असल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादीने जाहीर केले असले तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आकाराला येणार की नाही, याबाबत कार्यकर्त्यांतच संभ्रम आहे. म्हणून महाविकासच्या बांधणीकडे विशेष लक्ष आहे.

चौकट
तिरंगीचे संकेत, पण..?
गडहिंग्लज शहरात जनता दलाचे वर्चस्व दुर्लक्षून चालणार नाही. विधानसभा निवडणुकीत जनता दलने मुश्रीफ यांना पाठबळ दिले. हद्दवाढीची निवडणूकही दोघे एकत्र लढले. या दोन्ही निमित्तामागे शहर विकासासाठी निधी मिळेल ही अपेक्षा होती. मुश्रीफांनी निधीही दिला. दरम्यान, गोडसाखरच्या टोकाच्या राजकारणातून मुश्रीफ व जनता दलाचे नेते अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. गतवेळी पालिकेच्या सत्तेत भाजपला सोबत घेऊनही जनता दलाच्या पदरी निराशाच आली. आता जनता दलासमोर एक पारंपरिक तर दुसरा तात्विक विरोधक आहे. यामुळे सध्या तरी तिरंगीचेच संकेत असले तरी राज्यातील सत्ता बदलाचा परिणाम म्हणून भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी व जनता दलाची आघाडी होणार की, मुश्रीफ यांच्या विजयी वारुला थोपवण्यासाठी समरजित घाटगे जनता दलाची साथ मिळवणार? याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73785 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..