शाळा भरली, पण मोबाईल कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा भरली, पण मोबाईल कायम
शाळा भरली, पण मोबाईल कायम

शाळा भरली, पण मोबाईल कायम

sakal_logo
By

शाळा भरली; पण मोबाईल कायम
विद्यार्थ्यांकडून ‘होमवर्क’साठी वापर; तयार उत्तरे मिळविण्याकडे वाढता कल
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ : दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या साथीने शाळांना कुलपे लागली. पण, शिक्षण बंद करता येत नव्हते. त्यामुळे पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग निवडण्यात आला. त्यातून विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल आला. आता शाळा भरल्या तरी विद्यार्थ्यांच्या हातातून मोबाईल सुटलेला नाही. उलट त्यामध्ये पारंगत झालेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठीही मोबाईलचा अवलंब करणे सुरू केले आहे. शिक्षकांनी दिलेल्या ‘होमवर्क’ची मोबाईलच्या माध्यमातून तयार उत्तरे मिळविण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.
कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांनी आपले स्मार्टफोन विद्यार्थ्यांच्या हातात दिले. त्यापूर्वी मुले पालकांचे मोबाईल वापरत नव्हती असे नाही. पण, वापराचे प्रमाण कमी होते. मात्र, अभ्यासासाठी म्हणून विद्यार्थ्यांकडून मोबाईलचा वापर वाढला. काही पालकांनी तर आपल्या मुलांसाठी स्वतंत्र नवे मोबाईल घेऊन दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातात नेहमी मोबाईल दिसू लागले.
वास्तविक शाळा नियमित सुरु झाल्यानंतर हे चित्र बदलणे आवश्यक होते. पण, विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल कायम राहिल्याचे दिसून येत आहे. शिवाय ते पारंगत झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून गैरवापर होत आहे. अगदी शिक्षकांनी शाळेत दिलेला होमवर्क पूर्ण करण्यासाठीही वापर केला जात आहे. विद्यार्थ्यांकडून स्वाध्याय थेट गुगलवर सर्च केला जातो. त्यावर ऑडिओ, व्हिडिओ स्वरुपात तयार उत्तरे मिळत आहेत. ती विद्यार्थ्यांकडून उतरविली जात आहेत. खरे तर एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर पाठाच्या वाचनातून लिहिल्यामुळे, एखादे गणित समजून घेऊन सोडविल्यामुळे विद्यार्थ्यांची समज वाढते. पण, त्याला तिलांजली देत मोबाईलच्या माध्यमातून थेट उत्तरे मिळविण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.

चौकट...
पालकांत सजगता हवी...
कोरोनामुळे शाळा बंद असलेल्या काळात पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल वापराला मुभा दिली. आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या पालकांनी स्वतंत्र मोबाईल घेऊन दिले. तर अनेक विद्यार्थी पालकांचे मोबाईल वापरत होते. आता शाळा नियमित सुरू असताना मुलांना मोबाईलची गरज आहे का, आपली मुले मोबाईल कशासाठी वापरत आहेत यावर पालकांचे लक्ष असणे आवश्यक आहे. त्यांनी सजगता दाखविली तरच गैरवापर बंद होणे शक्य आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73970 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..