माळवरील रोप लावणीला महावितरणचा खोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळवरील रोप लावणीला महावितरणचा खोडा
माळवरील रोप लावणीला महावितरणचा खोडा

माळवरील रोप लावणीला महावितरणचा खोडा

sakal_logo
By

33636
अडकूर : येथे नदीतील पाण्याचा उपसा करून त्याआधारे रोपलावण केली जात आहे. (छायाचित्र : मनोहर देसाई, अडकूर)

माळावरील रोप लावणीला खोडा
विजेचे अयोग्य वेळापत्रक; दुपारी अडीचनंतरच्या भारनियमनामुळे फटका
सुनील कोंडुसकर : सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ४ : महावितरणचे शेती पंपासाठीचे भारनियमनाचे वेळापत्रक भाताच्या रोप लावणीसाठी मारक ठरत आहे. दुपारी अडीचनंतर वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेती कामाचा उरक करताना अडथळा येत आहे. कंपनीने शेती कामांसाठी व्यवहार्य वेळापत्रक निश्‍चित करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.
तालुक्यात सुमारे सोळा हजार हेक्टरवर भात पिकाची लागवड आहे. त्यापैकी सुमारे सहा हेक्टरहून अधिक क्षेत्रावर रोप लावण केली जाते. विशेषतः कोकण सीमेवरील कानूर, इब्राहीमपूर, गवसे, नागवे, न्हावेली, श्रीपादवाडी, हेरे, नागनवाडी, दाटे, अडकूरच्या पट्यात रोप लावण पद्धत आहे. भाताचे तरवे काढून पुन्हा ते चिखलामध्ये रोपण केले जातात. चिखल तयार करण्यासाठी पाण्याची गरज असते. अद्याप पावसाचे प्रमाण कमीच असल्याने शेतवडीत पाणी झालेले नाही. जून महिन्याच्या सुरवातीला पेरलेले तरवे लावणीयोग्य झाले आहेत; मात्र लागण करण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे. सध्या ताम्रपर्णी, घटप्रभा नदीला पाणी आले आहे. त्याचा उपसा करून रोप लावण करणे शक्य आहे; परंतु याच वेळी शेती पंपाच्या भारनियमनाचे वेळापत्रक बदलले आहे. रात्री साडेदहा ते पहाटे साडेसहापर्यंत रात्रपाळीचे, तर पहाटे साडेसहा ते दुपारी अडीचपर्यंत दिवसपाळी निश्‍चित केली आहे. रात्रीची वेळ अयोग्य आहेच, परंतु दिवसाही एवढ्या पहाटे मजूर शेतात येत नाहीत. दुपारी अडीचनंतर वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्यानंतरच्या कालावधीतही काम होत नाही. त्यामुळे मजुरीचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्याला पेलणे शक्य नाही. यासंदर्भात महावितरणशी संपर्क साधला असता हे वेळापत्रक वरिष्ठ कार्यालयाकडून तयार होऊन येत असल्याने आम्हाला ते बदलण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले जाते, परंतु शेती पंपाची स्वतंत्र वाहिनी असताना शेतकऱ्यांची सोय पाहून त्यात बदल करणे शक्य आहे. याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालून शेतकऱ्यांची सोय करावी, अशी मागणी आहे.
-----------------
कोट
तालुक्याच्या पश्चिम भागात रोपलावण हे खरीप हंगामातील मुख्य उद्दिष्ट असते. भाताची लावण योग्य वेळेत झाली, तरच अपेक्षित उत्पादन मिळू शकते. त्यासाठी शेतकरी आटापिटा करतो. नदी, ओढ्यातील पाणी शेतात आणण्याची त्याची तयारी असते; परंतु विजेचा पुरवठाच नसेल, तर पाणी उपसा करायचा कसा, असा प्रश्‍न आहे.
- रमेश देसाई, शेतकरी, गवसे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74032 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top