
पुरस्कारप्राप्त शिक्षकांना एक वेतनवाढ
आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना
एक वेतनवाढीचा आदेश ः भरत रसाळे
कोल्हापूर, ता. ४ ः राज्यातील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ देण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिली.
ग्रामविकास विभागाच्या १२ डिसेंबर २०००च्या शासन निर्णयानुसार जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अशा शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ देण्यात येत होती; पण सहाव्या वेतन आयोगामध्ये आगाऊ वेतनवाढ देण्याचा निर्णय प्रलंबित ठेवल्याने ४ सप्टेंबर २०१८ च्या शासन निर्णयाने या वेतनवाढी देण्याचा निर्णय रद्द केल्याने या वेतनवाढी देण्यात येत नव्हत्या. या निर्णयाविरोधात राज्यातील शिक्षकांनी उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल करून या वेतनवाढी लागू करण्याचा निर्णय मिळविला होता. कोल्हापुरातील सुनील सुतार, सुनील कारंजकर, गुंडोपंत देसाई यांच्यासह सुमारे दोनशे शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तथापि, राज्य शासनाने कोणालाही वेतनवाढ न देता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. १३ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली व एक वेतनवाढीचा लाभ शिक्षकांना देण्याचा निर्णय दिला. राज्यातील सुमारे पाच हजार हजार शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे, असेही त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74195 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..