
जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस
33793
कोल्हापूर ः जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर दमदार पाऊस झाला. पंचगंगेच्या पाण्याने राजाराम बंधाऱ्याची पातळी गाठली होती. रात्री हा बंधारा पाण्याखाली गेला.
फोटो : ३३७९१
बर्की (ता. शाहूवाडी) ः येथील कांते बंधारा सोमवारी पावसामुळे पाण्याखाली गेला होता.
राजाराम बंधारा पाण्याखाली
सर्वदूर दमदार पाऊस; बर्कीत अडकलेले पर्यटक सुखरूप
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः महिनाभर रुसलेल्या पावसाने आज दिवसभर जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत सरी कोसळत होत्या. पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, दमदार पावसामुळे सायंकाळी सात वाजता पंचगंगा नदीवरील कसबा बावडा येथील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला होता. सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली गेले होते.
भुईबावडा येथील घाटात दरड कोसळल्यामुळे तेथील वाहतूक दुपारनंतर बंद होती. शाहूवाडी तालुक्यातील बर्की येथील कांते बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे संपर्क तुटल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागातून देण्यात आली. शाहूवाडी तालुक्यातील बर्की धबधबा पाहण्यासाठी आज दुपारी दोन वाजता कोल्हापूर येथून दोन मिनीबस आणि आठ मोटारीमधून अंदाजे ७०- ८० पर्यटक गेले होते. परतीच्या प्रवासावेळी सायंकाळी पाच वाजता बर्की गावाजवळील तापेरा ओढा तसेच कासारी नदीवरील पुलावर पाणी आल्याने सर्व प्रवासी अडकले होते. दोन्ही ठिकाणची पाणी पातळी ओसरल्यावर सर्व वाहने आणि प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. या प्रवाशांना धीर देण्यासाठी आणि त्यांच्या व्यवस्थेसाठी बर्की ग्रामस्थ, तरुण मंडळाचे अध्यक्ष, गावकरी, रेशन दुकानदार, वनरक्षकांनी पुढाकार घेतला.
संपूर्ण जून उलटल्यानंतर पावसाने जिल्ह्यात दमदार सुरवात केली आहे. यलो अलर्ट असताना आज पहिल्याच दिवशी दुपारी झालेल्या दमदार पावसाने पंचगंगा नदीची पाणी पातळी दीड फुटांनी वाढली आहे. जिल्ह्यात आणखी तीन दिवस जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाकडून व्यक्त केला आहे. आज सकाळपासूनच पावसाच्या सुरू झालेल्या जोरदार सरी पुढे सायंकाळपर्यंत कायम राहिल्या. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी सकाळी दहा वाजता १५ फूट ४ इंचापर्यंत होती; मात्र सायंकाळी सातपर्यंत वाढत १६.३ फुटांपर्यंत पोचली. यामुळे यंदा प्रथमच राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. यामुळे कसबाबावडा ते वडणगे आणि त्या परिसरातील गावांतील वाहतूक बंद झाली.
जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यामुळे सायंकाळी सातपर्यंत जिल्ह्यात पाच बंधारे पाण्याखाली गेले. यामध्ये करवीर तालुक्यातील राजाराम बंधारा, हातकणंगले तालुक्यातील रुई,सांगशी आणि इचलकरंजी आणि शाहूवाडी तालुक्यातील कांते (बर्की धबधबा परिसर) हे पाण्याखाली गेले. काही ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतुकी सुरू आहे. तर बर्की धबधबा येथे कोणतेही पर्यटक अडकले नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागातून देण्यात आली. गगनबावडा येथील भुईबावडा या घाटात दुपारी दरड कोसळल्यामुळे तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोकणात जाण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. तो यंदाच्या पावसात पहिल्यांदाच बंद झाला आहे.
‘राधानगरी’ तून हजार क्युसेक विसर्ग
जिल्ह्यातील राधानगरी धरणात ६७.१८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. आज सकाळी सातच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून एक हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण पाच बंधारे बंधारे पाण्याखाली आहेत. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून १ हजार ५० तर अल्लमट्टी धरणातून ४५१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
अतिवृष्टी होत असताना पर्यटकांनी बर्की धबधब्यासह जिल्ह्यातील इतर सर्व धबधब्यांच्या ठिकाणी वर्षा सहलीला जाऊ नये.
- राहुल रेखावार, जिल्हाधिकारी
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74224 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..