
महापुरातील उपायांवर सतर्कता हवी; जनता दलाची मागणी
33921
गडहिंग्लज : संभाव्य महापूर कालावधीतील उपाययोजनांबाबत स्वरूप खारगे यांच्याशी चर्चा करताना जनता दलाचे शिष्टमंडळ.
महापुरातील उपायांवर सतर्कता हवी
जनता दलाची मागणी; पूरस्थितीत प्रशासन, पूरग्रस्तांच्या मदतीला येण्याची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : गेल्या दोन महापुरांवेळी जनता दलाचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्यापासून त्यांच्या राहण्याची व जेवणाची चांगली सोय केली. आता पालिकेत पदावर नसलो तरी गडहिंग्लजकर म्हणून आम्ही संभाव्य पूरस्थितीत प्रशासन व पूरग्रस्तांमागे खंबीरपणे उभे राहू, असे जनता दलाच्या शिष्टमंडळाने आज आश्वासित केले. संभाव्य महापुरातील उपाययोजना राबविण्याबाबत प्रशासनाची सतर्कता हवी, अशीही अपेक्षा व्यक्त केली.
पूरपरिस्थितीला सामोरे जाताना आवश्यक उपाययोजनांबाबत मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांच्याशी माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी, पक्षप्रतोद बसवराज खणगावे, माजी नगरसेवक राजेश बोरगावे, उदय पाटील, नरेंद्र भद्रापूर, शशिकला पाटील, सुनीता पाटील, अमोल हातरोटे आदींनी चर्चा केली. खारगे यांनी पुराचे पाणी येणाऱ्या भागातील नागरिकांना व धोकादायक इमारत मालकांना नोटिसा दिल्याचे सांगितले. दीडशे ते दोनशे पूरग्रस्तांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करावी लागेल. दोन महापुरांवेळी जनता दलाचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी त्याचे नियोजन केले होते. भविष्यातील पूरस्थितीत आम्ही सर्वजण प्रशासन व पूरग्रस्तांच्या मदतीला येऊ. विविध उपाययोजना राबवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने मदत करावी.
स्थलांतरितांची जनावरे, त्यांच्या चाऱ्याचे नियोजन करावे. नादुरुस्त बोटींची तातडीने दुरुस्ती करावी. अर्बन कॉलनीजवळच्या ओढ्याचे पाणी गतवेळी घरात घुसले होते. त्याला कारणीभूत असलेली शेजारील संरक्षक भिंत काढून घेण्यासाठी गिजवणे ग्रामपंचायतीला पत्र द्यावे. माणिकबाग परिसरात पाणी अडविले जाते. त्याची पाहणी आताच करावी. पूरकाळात अडथळा आल्यास टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्याचे नियोजन आतापासून करावे. पूरस्थिती उपाययोजनेबाबत समिती स्थापन करून त्यांचे संपर्क क्रमांक समाजमाध्यमांत प्रसारित करावेत. लाखे नगरजवळच्या नाला बांधकामाचे काम तत्काळ पूर्ण करून घेण्याची सूचना केली.
चौकट...
साथीचे रुग्ण कायम
नदीवेस भागातील विविध साथीचे रुग्ण कमी झाले असले तरी आता मांगलेवाडी, काजू बाग परिसरात असे रुग्ण वाढत आहेत. खासगी डॉक्टरांकडे जाऊन त्याचा सर्व्हे व्हायला हवा, तरच त्याचे गांभीर्य कळणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करुन साथीचे आजार पसरू नयेत, याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74450 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..