पिडीतांना एका छताखाली सर्व सेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिडीतांना एका छताखाली सर्व सेवा
पिडीतांना एका छताखाली सर्व सेवा

पिडीतांना एका छताखाली सर्व सेवा

sakal_logo
By

‘सखी’ ठरते आधार

अबला मिळतोय ‘सखी’चा हक्काचा आधार

‘सखी’ वन स्टॉप सेंटरमध्ये एकाच छताखाली सुविधा; तीन वर्षांत २१९ पीडितांना मदतीचा हात

नंदिनी नरेवाडी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः एकाच छताखाली मानसिक आधारासह अन्य सुविधा देत पीडित महिलांना ‘सखी’ वन स्टॉप सेंटर आधार ठरत आहे. घरगुती आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार व हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांना पडत्या काळात ‘सखी’मुळे मदत मिळते. तिला भविष्यात सन्मानाने जगता येऊ शकेल. तीन वर्षांत ‘सखी’ने २१९ महिलांना मदतीचा हात दिला आहे.

केंद्र शासनाच्या महिला व बाल कल्याण मंत्रालयाद्वारे विचारे माळ परिसरात सखी वन स्टॉप क्राइसेस सेंटर चालविले जाते. ‘सखी’ सेंटरची १४ खोल्यांची इमारत आहे. जेथे शहरासह जिल्ह्यातील महिलांना सर्वतोपरी मदत केली जाते. जिल्हास्तरावर हे केंद्र चालविण्यासाठी आरोग्य विभाग, गृह विभाग, सामाजिक न्याय विभाग, जिल्हा प्रशासन, राज्य विधी सेवा प्राधिकरण व स्वयंसेवी संस्था यांचा समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती केली आहे.
सखी सेंटरमध्ये फक्त पीडितांनाच नव्हे तर वेळप्रसंगी परगावातील महिला-तरुणींना राहण्याची गरज भासल्यास पाच दिवसांसाठी निवाऱ्यासह भोजनाचीही मोफत व्यवस्था होते. कौटुंबिक हिंसा, हुंड्यासाठी होणारा छळ, महिला व अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ, शाळा व महाविद्यालयात होणारी छेडछाड, सायबर गुन्हे, महिलांसंबंधी इतर त्रास, कामाच्या ठिकाणी त्रास, ॲसिड हल्ला, बलात्कार तसेच मालमत्तेबाबत वादांत कायदेशीर सल्ला अशा विविध संकटांत महिलांना विविध सुविधा दिल्या जातात. पीडितेला जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही सेंटरद्वारे प्रयत्न केले जातात. सेंटरमध्ये २४ तास सिक्युरिटी गार्डसह, वैद्यकीय सुविधा व सीसीटीव्हीची सुविधा दिली आहे.
सखीचे कामकाज पाहण्यासाठी आनंदीबाई महिला बहुउद्देशीय संस्थेची निवड केली असून संस्थेच्या वैशाली महाडिक व महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेंटरचे कामकाज चालते.
---------
सहा महिन्यांच्या बाळाची आणि आईची भेट
कोविड काळात सखी सेंटरकडे बऱ्याच महिलांनी घरगुती अत्याचारांबाबत मदत मागितली. उस्मानाबाद जिल्ह्यातील माहेर असलेल्या व कोल्हापूर सासर असलेल्या एका महिलेला घरगुती अत्याचार सहन करावा लागला. यातून तिला तिच्या सात महिन्याच्या बाळाला सोडून माहेरी पाठविले. लॉकडाउनमुळे तिला येण्यात अडचणी येत होत्या. अशा काळात उस्मानाबाद येथील सखी सेंटरने कोल्हापूर सेंटरशी संपर्क साधला. सासरच्या व्यक्तींचे समूपदेशन केल्यानंतर तिच्या बाळाशी भेट घडवून आणण्यात सखी सेंटर यशस्वी झाल्याचे केंद्र प्रशासक रोहिणी घोसाळकर यांनी सांगितले.
-------
पीडितांना या मिळतात सुविधा
- रेस्क्यू व्हॅन
- रुग्णवाहिका
- पोलिस तक्रार नोंदविण्यास मदत
- कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन
- वैद्यकीय मदत
- मानसिक आधार व समुपदेशन
-----------
कोट
महिलांना एकाच छताखाली मदतीसह सर्व शासकीय सुविधा ‘सखी वन स्टॉप'' सेंटरमध्ये दिल्या जातात. येथे १४ जणांची टिम कार्यरत असून महिलांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासोबत त्यांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जातो.
- रोहिणी घोसाळकर, केंद्र प्रशासक

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74711 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top