
पालक सचिव दराडे आढावा बैठक
३४२५४
अलमट्टी, कोयनेतून विसर्गावर लक्ष ठेवा
---
पालक सचिव प्रवीण दराडे; ‘टीम वर्क’ने संभाव्य पूरस्थिती समन्वयाने हाताळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : अलमट्टी धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबत कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाशी आणि कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबतही पाटबंधारे विभागाने समन्वय ठेवावा. ‘टीम वर्क’ म्हणून संभाव्य पूरस्थिती संयमाने हाताळा, आपत्कालीन परिस्थितीची शक्यता गृहीत धरून पूरस्थिती पूर्व, पूरस्थिती काळात व पूरस्थिती पश्चात आवश्यक कामांचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालक सचिव प्रवीण दराडे यांनी केल्या.
जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, पंचगंगा इशारा पातळीकडे सरकत आहे. हवामान खात्यानेही शुक्रवार (ता. ८)पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी संवाद साधला होता. यानंतर आज पालक सचिव दराडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याच्या पूरस्थिती नियोजनाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात झाली.
जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन केलेल्या नियोजनाचे कौतुक करून श्री. दराडे म्हणाले, ‘‘अलमट्टीतून सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबत कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाशी तसेच कोयनेतून सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबतही पाटबंधारे विभागाने समन्वय ठेवावा. आपत्कालीन स्थितीत त्रुटी राहता कामा नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे. कोणतीही घटना घडल्यास तत्काळ पोचण्यासाठी विभागप्रमुखांनी मुख्यालय सोडू नये. आपत्कालीन स्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी ‘टीम लीडर’ म्हणून, तर अन्य सर्व विभागांनी मार्गदर्शनाखाली काम करावे.’’
श्री. दराडे म्हणाले, ‘‘पूरबाधित नागरिकांचे व जनावरांचे वेळेत स्थलांतर करा. स्थलांतरित नागरिकांच्या कॅम्पमध्ये सर्व सेवा द्या. नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांनी त्या-त्या ठिकाणांची पाहणी केल्याचा अहवाल मागवून घ्या. पुराचे पाणी येणाऱ्या मार्गांवर व पुलांवर पोलिस कर्मचारी तैनात ठेवा. पूरस्थितीत रोगराई पसरू नये, यासाठी स्थलांतरित कॅम्पमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा करा.’’
जिल्हाधिकारी रेखावार यांनी पूर व्यवस्थापनासाठी केलेल्या नियोजनाचे सादरीकरण केले. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांच्यासह विविध विभागप्रमुखांनी केलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. दराडे म्हणाले...
पाणी शुद्ध अथवा उकळून पिण्याबाबत जनजागृती
रोगराई पसरू नये, यासाठी जंतुनाशक फवारणी करा
अपघात टाळण्यासाठी महामार्गावरील खड्डे भरा
पूरस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74842 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..