उघडीप, पण रेल अलर्ट कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उघडीप, पण रेल अलर्ट कायम
उघडीप, पण रेल अलर्ट कायम

उघडीप, पण रेल अलर्ट कायम

sakal_logo
By

३४२०२
इचलकरंजी ः पंचगंगेच्या पाण्याने जुन्या पुलाच्या काठांना बुधवारी स्पर्श केला. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा रस्ता बंद केला आहे.

उघडीप, पण ‘रेड अलर्ट’ कायम
---
पंचगंगा स्थिरावली; तूर्त धोका टळल्याने दिलासा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः जिल्ह्यात आज दिवसभरात पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली. मात्र, पुढील तीन दिवसांचा ‘रेड अलर्ट’ कायम आहे. उघडिपीमुळे पंचगंगेची पाणीपातळी सायंकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत स्थिर राहिली. रात्री दहाच्या दरम्यान पातळी ३२.२ फूट होती. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट असून, धोका पातळी ४३ फूट आहे. ‘रेड अलर्ट’ असला तरीही पावसाचे प्रमाण कमी असल्याने उद्या (ता. ७)पर्यंत पंचगंगेची पाणीपातळी कमी होईल, असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला. तरीही नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
राधानगरी धरणातील साठा गेल्या चार दिवसांत नऊ टक्क्यांनी वाढून ३७ टक्‍यांपर्यंत पोचला आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यापाशी रात्री नऊला पातळी ३२.१ फूट होती. त्यापूर्वी तासभर आधी पातळी ३२. ४ फूट होती. सकाळी नऊला ती ३१ फुटार्यंत होती. त्यानंतर रात्री आठपर्यंत केवळ एक-सव्वा फुटाने वाढली होती. सकाळी जिल्ह्यातील २९ बंधारे पाण्याखाली होते. त्यापैकी कुंभी नदीवरील सोनवडे आणि वेतवडे या दोन बंधाऱ्यांवरील रात्री नऊच्या दरम्यान खुले झाले होते. त्यामुळे एकूण २७ बंधारे पाण्याखाली राहिले. दरम्यान, ‘एनडीआरएफ’च्या पथकाने आज दुपारी शिवाजी पूल आणि परिसरात तसेच पंचगंगा नदीची पाहणी केली. विपरित परिस्थितीत मदतकार्य कसे राबविता येईल, या दृष्टीने ही पाहणी होती.
हवामानशास्त्र विभागाने जिल्ह्यासाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार ९ जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: ८ जुलैपर्यंत ‘रेड अलर्ट’ व ९ जुलैपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी आहे. जिल्ह्यात याच पद्धतीने पाऊस सुरू राहिला तर पंचगंगा, दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा, वेदगंगा नद्या उद्या सकाळी सातपर्यंत इशारा पातळीपर्यंत जाण्याची शक्यता होती; मात्र आता ती मावळली असल्याचे दिसून आले.
पावसामुळे डोंगराळ भागात भूस्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना पूर येणे किंवा गावठाणातील जुन्या धोकादायक घरांची पडझड अशा घटना संभवत आहेत. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

२७ बंधारे पाण्याखाली
जिल्ह्यातील राधानगरी धरणात ८७.७६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. आज दुपारी चारच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १२०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण २७ बंधारे पाण्याखाली आहेत. घटप्रभा मध्यम प्रकल्प आज दुपारी एकला पूर्ण क्षमतेने भरला.

गगनबावड्यात अतिवृष्टी
जिल्ह्यात आज सकाळी ९.४२ पर्यंतच्या २४ तासांत झालेल्या एकूण पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलिमीटरमध्ये अशी ः हातकणंगले- १९.७, शिरोळ- १४.२, पन्हाळा- ४९.८, शाहूवाडी- ४३.६, राधानगरी- ६१.९, गगनबावडा- १३४.९, करवीर- ४१.८, कागल- ३९.९, गडहिंग्लज- ३३.५, भुदरगड- ७७.३, आजरा- ५१, चंदगड- ५३.३

धरणातील पाणीसाठा (दशलक्ष घनमीटर)
तुळशी ४२.४५, वारणा ३५३.०३, दूधगंगा २१९.६५, कासारी ३४.३०, कडवी २६.१०, कुंभी ३५.०१, पाटगाव ४२.५३, चिकोत्रा १९.७६, चित्री १८.४७, जंगमहट्टी १४.६५, घटप्रभा ४२.६१, जांबरे १०.१४, आंबेआहोळ १९.२५, कोदे (ल.पा.) ५.८३.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74886 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top