
ज्याला तिकिट मिळेल त्याच्या मागे ताकद लावू
जिल्हा परिषद लोगो
तिकीट मिळेल त्याला ताकद देऊ
इच्छुकांचे साटेलोटे सुरू; नेत्यांवर प्रभाव टाकण्याचे शर्थीचे प्रयत्न
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत, त्याआधीच गावागावांतील इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे तिकिटासाठी फिल्डिंग लावली आहे. यातूनही मार्ग काढत एकाच प्रभागात जास्त इच्छुक उमेदवार साटेलोटे करत आहेत. तिकिटासाठी सर्वांनी ताकद लावू; पण ज्याला तिकीट मिळेल त्याला मदत करण्याचा शब्द एकमेकांकडून घेतला जात आहे.
मिनी मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषदेसाठी नवोदित इच्छुकांनी पाच वर्षांपासून समाजकार्याला सुरुवात केली आहे. विद्यमान सदस्य आपापल्या प्रभागात किती निधी दिला. कोणाच्या गल्लीत किती काम केले. याच्या नोंदीचे पुस्तक तयार करत आहेत. तर यंदाच्या निवडणुकीत आमचे ‘साहेब’ मलाच तिकीट देणार म्हणून एका एका प्रभागात चार ते पाच जण कामाला लागले आहेत. नवोदित इच्छुक कोणाचे लग्न असो, कोणाचे बारसे असो, मृत झालेले असो अशांच्या घरी जाऊन आपण किती तत्पर आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यांच्या ‘साहेबांनी’ जो भेटतो त्याला तिकीट देणारच, असे संकेत देत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला उत्साह आला आहे. कोण साहेबांचा जवळचा हे विविध कार्यक्रम घेऊन दाखवले जात आहे.
ज्या ज्या गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे, अशा गावात इच्छुक मदतीसाठी धावून जात आहेत. पूर येण्याआधीच होत असलेली तत्परता ग्रामस्थही जाणून आहेत. अपक्ष लढण्याऐवजी पक्षाकडून लढल्यास विजयी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जो नेता आपल्याला पक्षाचे तिकीट मिळवून देईल त्या नेत्यांच्या मागे गर्दी दिसत आहे. विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन आपल्या साहेबांना उद्घाटनाला बोलावून गावागावांत ताकद कशी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत सर्वजणच ईर्षेला पेटले आहेत. नेत्यांनाही कोणाला तिकीट द्यायचे आणि कोणाला नाही, याची डोकेदुखी होणार आहे. यातच ज्याला तिकीट मिळेल त्याच्या मागून इतर इच्छुकांना प्रचाराला फिरावे लागेल, असा शब्द घेतला जात आहे. याला एकमेकांचा होकार ही घेतला जात आहे.
पलटी मारण्याची शक्यता...
सध्या प्रत्येकाला तिकीट मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वजण एकमेकांना शब्द देत आहेत; पण तिकीट न मिळाल्यास पलटी मारणारे अनेकजण आहेत. त्यामुळे या शब्दाला किती महत्त्व आहे, हे येणारा काळच ठरवेल.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75501 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..