
गडहिंग्लज पालिकेत तिरंगी लढत शक्य
गडहिंग्लज नगरपालिका
गडहिंग्लजला तिरंगी लढत शक्य
गडहिंग्लज, ता. ८ : सद्यःस्थितीतील राजकीय वातावरण पाहता येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता आहे. जनता दल, राष्ट्रवादी आणि भाजप हे तीन प्रमुख पक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकण्याचे संकेत आहेत. महाविकास आघाडीच्या बांधणीसाठी राष्ट्रवादीने पुढाकार घेतला आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी तसे जाहीरही केले आहे. शिवसेना व काँग्रेसने मात्र अद्याप अशा आघाडीसंदर्भात भूमिका स्पष्ट केलेली नाही. आता सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर ‘महाविकास’च्या बांधणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जनता दल नेहमीप्रमाणे ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेत असून भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी वेळोवेळी पालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याची घोषणा केली आहे. राज्यातील सत्ता, राज्यसभा खासदार म्हणून धनंजय महाडिक यांना मिळालेली संधी यामुळे या निवडणुकीच्या रिंगणात भाजप जोरात उतरण्याची शक्यता आहे. भाजपला, विशेषतः समरजित घाटगे यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीसुद्धा तितक्याच ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत असेल, यात शंका नाही. कागलच्या दोन्ही नेत्यातील या ईर्षेत जनता दलाचे श्रीपतराव शिंदे यांची व्यूहरचना काय असणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरम्यान, सध्याचे चित्र काहीही असले तरी ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर कोणतेही राजकीय चमत्कार घडवण्याची गडहिंग्लजची परंपरा आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75571 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..