‘माती’शी नातं जोडा जमीनी ‘क्षारां’पासून वाचवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘माती’शी नातं जोडा जमीनी ‘क्षारां’पासून वाचवा
‘माती’शी नातं जोडा जमीनी ‘क्षारां’पासून वाचवा

‘माती’शी नातं जोडा जमीनी ‘क्षारां’पासून वाचवा

sakal_logo
By

34932

हिरण्यकेशी काठी
क्षारपडीची धोका
वाढले क्षार; एकच पीक घेतल्याने जमिनी पाणथळ

लीड
चित्री मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील बारमाही पाण्याने गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी काठ परिसरात हरितक्रांती अवतरली. केवळ उपलब्ध पाणी वापरूनच उत्पन्न घेण्याच्या मानसिकतेमुळे नदीकाठच्या जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. मातीतील क्षारता व सामू वाढत चालले आहे. वर्षानुवर्षे त्याच त्या जमिनीतून ऊस हे एकच पीक घेतल्याने जमिनी पाणथळ बनल्या आहेत. त्याचे रुपांतर आता जमिनीत अतिक्षार साठण्याकडे होत आहे. शेतकऱ्यांना ही धोक्याची घंटा आहे. भावी पिढीच्या ताब्यात आपण कोणती जमीन देणार आहोत, याचा विचार आतापासून व्हायला हवा. जमिनीला केवळ पाण्याचीच गरज नसते. त्याला इतर घटकही आवश्यक असतात. नेमके त्याकडेच दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी माती परीक्षणाची वाट धुंडाळावी लागेल. त्यातून तयार होणाऱ्या आरोग्य पत्रिकेद्वारे नदीकाठाच्या जमिनींची क्षारपडीकडे होणारी वाटचाल थांबविण्यासह जमिनीचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची जबाबदारी आता वाढली आहे.
- अजित माद्याळे, गडहिंग्लज
----------------

माती परीक्षणाचे महत्त्‍व
जमिनीतील मातीचे गुणधर्म ओळखण्यासाठी माती परीक्षण गरजेचे आहे. मनुष्य प्राणी वेळोवेळी जसे आपल्या प्रकृतीची तपासणी करून घेतो, तसेच मातीचेही आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करतो, त्यावर प्रेम केल्यास त्याच्याशी एकरूपता वाढते. त्यानुसार शेतकऱ्या‍यांनी मातीची प्रकृती जाणण्यासाठी आपलं नातं घट्ट करण्याची वेळ आली आहे. मातीत कोणकोणते गुणधर्म आहेत, कोणते घटक कमी-जास्त आहेत हे पाहण्यासाठी माती परीक्षणाची वाट धुंडाळावी लागेल. जमिनीची आरोग्य पत्रिका एकदा तयार झाली तर त्यानुसार जमिनीच्या समस्या काय आहेत, मातीतील कमी घटकांची मात्रा वाढविणे, वाढलेले घटक कमी करण्याचे मार्ग मिळतो. त्यातूनच जमिनीचे आरोग्य सदृढ बनू शकते.

तरुणांनी स्वीकारले आधुनिक तंत्रज्ञान
अलीकडील काही वर्षापासून गडहिंग्लज विभागातील उच्चशिक्षित तरुण शेतीकडे वळले आहेत. त्यांनी प्रत्येक हंगामातील क्रॉपिंग पॅटर्ननुसार आपल्या शेतातील माती परीक्षण करीत आहेत. त्यानुसार जमिनीला आवश्यक घटकांचा पुरवठा केल्याने उत्पादनही वाढल्याचे दिसले आहे. जुन्या शेतकऱ्यांतून आधुनिकतेकडे वळणारे काही शेतकरीही वर्षातून एकदा शेतातील मातीचे परीक्षण करुन घेत आहेत. यामुळे त्यांनाही त्याचा फायदा होत आहे.

सेंद्रिय कर्बाचा समतोल राखा
अलीकडे शेतात सहा इंचाच्या नांगरचे प्रमाण वाढले आहे. दोन फूट खोलीचे नांगर नगण्य झाले आहे. यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा समतोल बिघडत चालला आहे. परिणामी जमिनीचे वजन वाढत आहे. सहा इंचाखालील जमिनीत घट्ट थर तयार होत आहे. यामुळे जमिनीची पौष्‍टिक प्रक्रिया होत नाही. हुमणी वाढण्यामागच्या कारणापैकी हे एक कारण आहे. पूर्व मशागत चांगली करून सेंद्रिय कर्बाचा समतोल राखणे आवश्यक आहे.

नत्र, स्फुरद आणि पालाशचा मारा
शेतकरी आपल्या शेतातील पिकांवर केवळ नत्र, स्फुरद व पालाश (एनपीके) या मात्रेचाच मारा करीत आहे. मात्र सूक्ष्म अन्नद्रव्य वाढविण्याकडे कोणाचेच लक्ष नाही. जमिनीचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी अन्नद्रव्यांचे योगदान महत्त्‍वपूर्ण आहे. हिरण्यकेशी नदीकाठच्या जमिनीत बोरॉन आणि सल्फर या सूक्ष्म अन्नद्रव्याची प्रचंड प्रमाणात कमतरता आहे. यांसह कॉपर, फेरस, मॅग्नेट, झिंक आदी सुक्ष्म अन्नद्रव्याचीही कमतरता आहे. जमिनीतील हवेचे प्रमाण वाढविण्यासाठी या अन्नद्रव्यांसह सेंद्रिय खताची मात्राही तितकीच महत्त्‍वाची आहे.

सूक्ष्म अन्नद्रव्यातून उत्पन्न वाढ
जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल नसल्याचा तोटा पिकाच्या उत्पन्नावर व कीडरोग वाढीवर दिसत आहे. पिकाच्या पानांचा कडा तांबडे होण्यासह तांबेरा, बुरशीचेही प्रमाण वाढत आहे. सोयाबीन, भुईमुगाचे दाणे पोचट निघत आहेत. पूर्वभागातील भाजीपाला उत्पादकांची खर्चाची मानसिकता आहे. परंतु त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. माती परीक्षणाचा आधार न घेताच केवळ मार्केटवर अवलंबून भाजीपाला उत्पादन सुरू आहे. माती परीक्षणानुसार सेंद्रिय खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा दिल्यास आहे त्या उत्पन्नापेक्षा २५ ते ३० टक्के उत्पन्न वाढू शकते.

प्रबोधन मेळावे हवेत
नदीकाठच्या जमीनीत सातत्याने साठणारे पाणी, त्यामुळे वाढणारे क्षार, सुक्ष्म अन्नद्रव्यांची व सेंद्रीय खतांच्या कमतरतेमुळे ऊस उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे प्रत्येक गावची सरासरी अद्यापही एकरी ३० टनाच्या पुढे गेलेली नाही. यातून शेतकऱ्यां‍च्या सोसायटीतील कर्जेंही भागत नाहीत. माती परीक्षण करणे, त्यानुसार खते, सेंद्रीय जिवाणूंचा वापर केल्यास हेच उत्पन्न निश्‍चित ४५ टनावर जाईल. यासाठी हेमरस, संताजी घोरपडे साखर कारखाना माती परीक्षण, जीवाणू व सेंद्रीय खते पिकांना देण्यासाठी शेतकऱ्यां‍ना प्रोत्साहीत करीत आहेत. माती परीक्षणाचे मेळावे घेत आहेत. परंतु, यासाठी शेतकरी, कारखाने, कृषी खात्याने हातात हात घालून प्रबोधनाची मोहिम राबविल्यास निश्‍चितच जमीनीचे आरोग्य सुधारुन उत्पन्नाचे आकडे वाढत राहतील.

क्षारयुक्त जमीनीची लक्षणे
- जमिनीचा सामू (पी.एच.) 8.5 पेक्षा कमी असतो.
- जमिनीची क्षारता 1 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते
- सोडिअमचे प्रमाण 15 टक्क्यांपेक्षा कमी असते
- उन्हाळ्यामध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर पांढर्‍या क्षारांचा पातळ थर आढळतो
- जमिनीतील पाण्याची पातळी एक मीटरच्या आत असते.
- पिकांची पाने पिवळी पडून वाढ खुंटते

जमीनीत क्षार वाढण्याची कारणे
- क्षारयुक्त पाण्याचा पिकासाठी वापर
- उसासाठी पाण्यासह, रासायनिक खते व किटकनाशकांचा अमर्याद वापर
- आवश्यकतेपेक्षा जास्त पाण्याने जमिनीतील क्षार मुळाजवळ येतात
- काळ्या जमिनीतील पाणी निचऱ्याचा अभाव
- पीकांचे फेरपालट न करणे, सखल भागातील जमीनी
- नैसर्गिक उताराचा अभाव
- यांत्रिकीकरणांमुळे नैसर्गिक चर बंदी
- सेंद्रिय व हिरवळीच्या खतांचा कमी वापर
- पाऊसमानापेक्षा बाष्पीभवनचे प्रमाण अधिक

क्षार न वाढण्यासाठी हे करा
- जमीनीत पाणी साठणार नाही याची काळजी घ्या
- पाण्याच्या निचऱ्यासाठी जमीनीत योग्य अंतरावर चर हवेत
- जमीनीतील पाणी पातळी दोन मीटरच्या खाली असावी
- पिकाच्या वाढीसाठी आवश्यक इतकेच पाणी द्या. विशेषत: उसाला खत व पाणी योग्य हवे.- सेंद्रीय पदार्थ, हिरवळीच्या खतांमुळे हवा खेळती राहण्यासह पाण्याचा निचरा होतो
- विहिरीचे पाणी खारट असल्यास ते पिकाला वापरु नये
- वारंवार माती व पाणी परीक्षणाद्वारे जमिनीचे भौतिक, रासायनिक बदलाची माहिती घ्यावी
- ठिबक, तुषार अशा सुक्ष्म सिंचन पद्धती वापराव्यात
- क्षारांना प्रतिकार करणाऱ्या पिकांची निवड करावी

पाण्यावाटे करा क्षारांचा निचरा
योग्य पाणी निचऱ्यामुळे पिकांच्या मुळांना अन्नद्रव्ये व्यवस्थित मिळतात. क्षारयुक्त जमिनीच्या सुधारणांमध्ये पाण्यावाटे क्षारांचा निचरा करण्याच्या दोन पद्धती आहेत. उघडे चर निचरा पद्धतीत तीन ते चार फूट खोलीचे चर शेतजमिनीच्या उताराच्या आडव्या दिशेने घेऊन ते चर मुख्य चरात किंवा नाल्यास जोडून पाण्याचा निचरा करावा. सच्छिद्र पाईप निचरा पद्धतीत शेतात प्रत्येक वीस मीटरच्या अंतरावर एक मीटर खोलीने एक सच्छिद्र पाईप टाकावी. या पाईप्स मुख्य पाईपला जोडून ती नदी, ओढ्याला सोडावी. यातून क्षारांचा निचरा होतो.

मशागतीवेळी करावयाचे उपाय
- पूर्वमशागतीवेळी पाण्याचा निचरा चांगला होईल अशी व्यवस्था करावी
- पिकानुसार रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड करावी,
जेणेकरुन आवश्यक ओलावा टिकतो व अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो.
- चांगली व खोल उभी-आडवी नांगरट करून जमीन भुसभुशीत करावी.

१६०० हेक्टरला धोका
हिरण्यकेशी नदीच्या उत्तर व दक्षिण या दोन्ही बाजूला फक्त काठावरील जमीन अंदाजे १६०० हेक्टर इतकी आहे. जे शेतकरी माती परीक्षणानुसार खतांची मात्रा, ठिबक सिंचनाचा वापर केला आहे त्यांच्याच जमीनीचा पी.एच. व क्षारता नियंत्रणात आहे. परंतु, बहुतांशी म्हणजेच पन्नास टक्क्यांवर जमीनीतील वरील घटक वाढू लागल्याने जमीन नापिकीच्या घंटा वाजायला सुरु झाल्याचे संकेत शेती तज्ञ देत आहेत.
---------------
धोक्याची घंटा
- जमीनीतील सर्वसामान्य पी. एच. : ६.५ ते ७.५
- परिसरातील सध्याचा पी. एच. : ७.५ ते ८.५
---------------
- क्षारतेचे टप्पे (डेसी सायमन प्रति मीटरमध्ये)
- ० ते २ : सर्वसामान्य
- २ ते ४ : संवेदनशील पिकांवर परिणाम
- ४ ते ८ : सर्व पिकांना हानीकारक
- परिसरातील सध्याची सरासरी क्षारता : २ डेसी सायमन प्रति मीटर.

ही गावे व्हायला हवीत सतर्क
हिरलगे, कौलगे, ऐनापूर, इंचनाळ, महागाव, हरळी, भडगाव, जरळी, मुगळी, नूल, हेब्बाळ कसबा नूल, निलजी, मुत्नाळ, हिटणी, खणदाळ, नांगनूर, इदरगुच्ची, कडलगे या गावांतील नदीकाठच्या जमीनींची क्षारता वाढत असल्याने प्रति कृष्णा काठचा धोका संभवतो. यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच जागे होवून पाण्याचा योग्य वापर व माती परीक्षणानुसार खतांच्या मात्रेसाठी आतापासूनच सवय लावून घ्यावी.


कोट...
34933
गडहिंग्लज, आजरा व चंदगडमधील नदीकाठ व अति पावसाच्या ठिकाणाच्या जमीनीतील क्षारांचे प्रमाण वाढत आहे. सुक्ष्म अन्नद्रव्यांची मोठी कमतरता आहे. क्षारतेचे प्रमाण वाढत आहे. याकडे शेतकर्‍यांचे लक्षच नाही. आता जमीनी वाचवण्यासाठी प्रबोधनाची चळवळ हाती घ्यायला हवी. शेतकऱ्यांनीही मशागतीपासून पिक कापणीपर्यंतच्या टप्प्यांवर लक्ष देण्याची वेळ आली आहे.
- दयानंद देसाई, माती परीक्षण प्रयोगशाळा चालक हिरलगे
--------------
34934
सर्वच नदी काठांवरील जमीनी पाणथळ बनत चालल्या आहेत. शेतकऱ्यांनी वेळीच लक्ष दिले नाही, तर जमीनी ‘चोपण’ होण्यापासून वाचविणे कठीण आहे. पाणथळ जमीनीतील उसाचे उत्पादन एकरी २० ते २५ टनावर आली आहे. शेतकऱ्यांनी माती परीक्षण करुन क्षारता तपासावी. क्षार वाढल्यास धैंचा, ताग ही हिरवळीची खते मातीत गाडावीत.
- डॉ. श्रीमंत राठोड, सहा. प्राध्यापक कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज
----------------
34935
हिरण्यकेशी नदीकाठावरील भडगावसह पूर्व भागातील जमीनीतील मातीत क्षार वाढत आहेत. माती परीक्षण करुन घेण्याकडे बहुतांशी शेतकरी पाठ फिरवतात. पण यापुढे माती परीक्षणावरच उत्पन्नाचे आकडे ठरणार आहेत. भडगावसह सर्वच गावातील जमीनींचा सरासरी पी.एच. 7.5 ते 8.5 टक्के आहे. पीएच वाढलेल्या जमीनीत ताग, धैंचा या हिरवळीच्या खतांची शिफारस केली आहे.
- अनिल कांबळे, कृषी सहायक भडगाव---------------
34936
मी एक तपापासून बारा एकरमध्ये ठिबक सिंचन पद्धत वापरत आहे. उसाचा खोडवा काढून दुसरे पिक घेताना कंपल्सरी मी माती परीक्षण करुन घेतो. यामुळे माझ्या जमीनीतील सुक्ष्म अन्नद्रव्यांसह जमीनीचे आरोग्य समतोल ठेवणे शक्य झाले आहे. क्षार शोषून घेणारी आंतरपिके घेतो. मातीतील कार्बनचे प्रमाणही चांगले असल्याने क्षार वाढलेले नाहीत. दरवर्षी मी पाचट कायम ठेवतो.
- चंद्रशेखर मोळदी, शेतकरी, भडगावी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75886 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..