महावितरणचा यंत्रमागधारकांना ‘शॉक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरणचा यंत्रमागधारकांना ‘शॉक’
महावितरणचा यंत्रमागधारकांना ‘शॉक’

महावितरणचा यंत्रमागधारकांना ‘शॉक’

sakal_logo
By

महावितरणचा यंत्रमागधारकांना ‘शॉक’
इचलकरंजीत इंधन अधिभार आकारणीमुळे १८ कोटींचा भुर्दंड; उद्योजकांचे आर्थिक नियोजन कोलमडले
पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ११ : महावितरण कंपनीकडून वीज बिलांतून इंधन अधिभार आकारल्यामुळे यंत्रमागधारकांची झोप उडाली आहे. यामुळे शहरातील यंत्रमागधारकांवर तब्बल १८ कोटींचा भुर्दंड या महिन्यात बसला आहे. याविरोधात दाद मागणे सहज सोपे नाही. वीज बिल भरल्याशिवाय पर्यायही नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे महावितरणकडून मिळालेल्या या जबर शॉकमुळे यंत्रमाग उद्योगात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
यंत्रमाग उद्योग काही वर्षांपासून अनेक अडचणींतून जात आहे. त्यामुळे या उद्योगात अस्थिरता निर्माण होत चालली आहे. एका संकटातून बाहेर पडत असताना आता इंधन अधिभाराचे नवे संकट या उद्योगासमोर निर्माण झाले आहे. महावितरण कंपनीकडून गेल्या महिन्यातील वीज वापराची बिले यंत्रमागधारकांच्या हातात पडत आहेत. बिले पाहून यंत्रमागधारकांना धक्का बसला आहे. यामध्ये इंधन अधिभार आकारल्याने बिलांमध्ये जबर वाढ झाली आहे.
एकीकडे विविध कारणांनी यंत्रमागधारकांचे आर्थिक नियोजन बिघडत असताना या नव्या संकटाने यंत्रमागधारक मेटाकुटीस आला आहे. साधारणपणे २७ एचपीखालील यंत्रमागधारकांच्या वीज बिलात प्रति युनिट ८५ पैसे इतका इंधन अधिभार आकारला आहे. तर २७ एचपीवरील यंत्रमागधारकांचे तर कंबरडेच मोडले आहे. त्यांच्या वीज बिलांत प्रति युनिट १ रुपये २ पैसे इतका इंधन अधिभार लावला आहे.
साध्या २४ यंत्रमागाच्या कारखान्याच्या वीज बिलात साधारणपणे ५ ते ६ हजार रुपये वाढून आले आहेत. २४ अॅटोलूम कारखान्याच्या वीज बिलात तब्बल २ ते अडीच लाख वाढ झाली आहे. शहरातील या दोन्ही प्रकारच्या यंत्रमागधारकांवर साधारणपणे या महिन्यात १८ कोटींचा भुर्दंड बसला असल्याची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली. या आकारणीला विरोध करता येत नाही व वीज बिल भरण्याशिवाय पर्यायही नाही. त्यामुळे यंत्रमागधारकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
---------
इंधन अधिभार कशासाठी?
वीज खरेदीचा दर निश्चित ठरलेला असतो; पण काही वेळा महावितरण कंपनीकडून जादा दराने वीज खरेदी केली जाते. त्यामध्ये होणारे नुकसान भरून काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी इंधन अधिभार मारला जातो. हा इंधन अधिभार प्रत्येक महिन्यात कमी-जास्त असू शकतो.
----
वीज उत्पादनाचा खर्च का वाढतो, इंधन अधिभार का लागला आहे, याकडे शासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे. कुणाच्या चुकीमुळे ग्राहकांच्या माथी इंधन अधिभार मारला जात आहे, याचा शोध घेऊन त्यांना कार्यमुक्त करावे.
-विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटना

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76373 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..