
जन्मदरातील मुलींची संख्या चालली घटत
जिल्हा परिषदेतून...
३५३४३
मुलींच्या जन्मदरातील घट चिंताजनक
लोकसंख्या दिन; प्रबोधनावर भर देण्याच्या प्रशासकांच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : देशात दरडोई उत्पन्नात जिल्हा अग्रेसर आहे. अनेक चळवळींचे माहेरघर म्हणून जिल्ह्याला ओळखले जाते. मात्र याच जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात घट होत आहे. पुरोगामी व चळवळीचे केंद्र असलेल्या या जिल्ह्याला ही बाब शोभनीय नाही. त्यामुळेच मुलगा, मुलगी असा भेदभाव न करता मुलींनाही सन्मान मिळावा, त्यांनाही चांगले शिक्षण व आरोग्य मिळावे, यासाठी प्रबोधन करावे, अशा सुचना जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिल्या.
जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून कुटूंब नियोजन निर्देशांकामध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना आरोग्य विभागाकडून गौरविण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून चव्हाण बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘लोकसंख्या विस्फोटाचे परिणाम आपण नियमितपणे पाहत आहोत. स्वातंत्र्यावेळी ३० कोटी असणारी देशाची लोकसंख्या आज १४० कोटीवर गेली आहे. आधुनिक औषधशास्त्रातील प्रगतीमुळे मृत्युदरही कमी झाला आहे. मात्र जन्म दर त्या तुलनेत कमी झालेला नाही. त्यामुळे भविष्यात जीवनावश्यक बाबींची कमतरता भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढलेल्या लोकसंख्येस शिक्षण, आरोग्य सुविधा पुरवण्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे भूकमारी, गुन्हेगारी आदी सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळेच लोकसंख्येला आळा घालणेही तितकेच आवश्यक आहे.’’
दिलासा सामाजिक विश्वस्त संस्थेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. रुपा शहा म्हणाल्या, ‘‘लोकसंख्या वाढीच्या संकटाबरोबरच घटणारे मुलींचं प्रमाण खूप चिंताजनक आहे. मुलींना शिकवून स्वावलंबी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. लहान वयातच मुलींचा विवाह करण्याचा आई-वडिलांचा विचार हा प्रतिगामी असून मुलीच्या भवितव्याचा विध्वंस करणारा आहे.’’
कार्यक्रमात अधुनिक संतती नियमनाच्या पध्दतीवर स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ डॉ. व्ही. पी. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी तर आभार जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. एफ. ए. देसाई यांनी मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76380 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..