
गणांच्या आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष
पेंडींग
गणांच्या आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष
पंचायत समिती निवडणूक; दहा मतदारसंघाचे निघणार आरक्षण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या (ता. १३) सकाळी अकरा वाजता मतदारसंघनिहाय (गण) आरक्षण जाहीर होणार आहे. तहसीलदार दिनेश पारगे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या आरक्षणांकडे तालुक्यातील इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यात हसूरचंपू, कसबा नूल, बसर्गे बुद्रुक, हलकर्णी, भडगाव, महागाव, गिजवणे, कडगाव, हडलगे, नेसरी असे दहा पंचायत समितीचे गण आहेत. बड्याचीवाडी गणाऐवजी हसूरचंपू, तर बिद्रेवाडी ऐवजी हडलगे अशी नवीन गणांची नावे झाली आहेत. मतदारसंघाच्या प्रभाग रचनेला अंतिम मान्यता मिळाली आहे. यामुळे आता प्रत्येक मतदारसंघनिहाय आरक्षण जाहीर होणार आहेत. ओबीसी आरक्षण वगळून अनुसुचित जाती, महिला आणि सर्वसाधारण असे तीनच गटांचे आरक्षण जाहीर होणार आहे.
ओबीसी आरक्षण नसल्याने आता संबंधित समाजातील इच्छुकांना सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सकारात्मक आला तरच ओबीसींना आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. परंतु आज सर्वोच्च न्यायालयात असलेली सुनावणी उद्यावर ढकलल्याने ओबीसी वगळूनच आरक्षण जाहीर होणार आहेत. जाहीर झालेल्या नगरपालिका निवडणुका ओबीसी वगळूनच घेण्यात येत आहेत. इच्छूकांनी हव्या त्या आरक्षणाची लॉटरी लागावी म्हणून देव पाण्यात घालून बसले आहेत. हसूरचंपू मतदारसंघात अनुसुचित जातींची लोकसंख्या अधिक असल्याने त्याठिकाणची जागा राखीव होण्याच्या शक्यतेची चर्चा आहे.
पंचायत समितीच्या सभागृहात काँग्रेस, राष्ट्रवादीने ताराराणी आघाडीची सत्ता होती. भाजप विरोधी बाकावर होती. येणाऱ्या निवडणुकीत आपल्याच पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी विविध राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. आरक्षणांच्या सोडतीनंतरच इच्छुकांची तयारी सुरू होणार आहे. यामुळे उद्याच्या आरक्षण सोडतीकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
-------------
चौकट
गट आरक्षणाची उत्सुकता
उद्याच कोल्हापूर येथे जिल्हा परिषद गटनिहाय आरक्षणही जाहीर होणार आहे. तालुक्यात नूल, हलकर्णी, गिजवणे, नेसरी व भडगाव असे पाच गट आहेत. विसर्जित सभागृहात तीन महिला, एक ओबीसी व एक सर्वसाधारण असे आरक्षण होते. यावेळच्या आरक्षणाची आता इच्छुकात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76492 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..