गड-किटवडे पाऊस रिपोर्ताज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-किटवडे पाऊस रिपोर्ताज
गड-किटवडे पाऊस रिपोर्ताज

गड-किटवडे पाऊस रिपोर्ताज

sakal_logo
By

35792
35791

लीड
लोगो ः पाऊस झेलणारी गावं
कोल्हापूर जिल्हा राज्यातला सर्वात पाणीदार. निसर्गाने पाण्याचे दान भरभरून दिले आहे. डोंगराळ भागातील काही गावांतून पावसाळ्यात शब्दशः धुवॉँधार पाऊस कोसळतो. या पावसाचं अप्रुप शहरांना वाटत असले तरी ग्रामस्थांना मात्र चार महिन्यांत जीव मुठीत घेऊन जगावे लागते. पर्यटकांना खुणावणारा हा पाऊस तेवढाच धडकी भरवणाराही असतो. अशा पाऊस झेलणाऱ्या गावांची गोष्ट...


तुमच्या चेरापुंजीचं आमाला काय कवतीक!
स्थानिकांच्या भावना; किटवडेच्या धुवॉँधार पावसासोबत चार महिने संघर्षच
अवधूत पाटील ः सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ ः अंगावर पाऊस झेलतच आजरा शहराची वेस ओलांडली. घाटकरवाडीत रोपलावणीच्या कामात मग्न असलेल्या शेतकऱ्याला किटवडेची माहिती विचारताच मूळ प्रश्नाला बगल देत ‘पावणं, रस्ता चुकला का काय’ असा प्रतिप्रश्न बरेच काही सांगून जात होता. थोड्याच अंतरावर हिरण्यकेशीवरील पूल लागला. किटवडेचा अन्य गावांशी संपर्क यावरच टिकून. पुलाला धडका देणारे पाणी केव्हा वर येईल, याची शाश्वती नव्हती. छोटा डांबरीकरण झालेला रस्ता. दोन्ही बाजूंना शेती. कुठेतरी उभा ऊस. रोपलावणीची घाई दिसत होती.
एका ठिकाणी दहा-पंधरा शेतकरी रोपलावणीत व्यस्त होते. सत्तरीतील आजीही अंगावरील इरले सावरत भाताची रोपे चिखलात खोवत होती. इतक्यात पावसाची मोठी सळक आली. तिथल्या पावसाबद्दल विचारले तर, ‘‘ह्यो पावूस आंगावर घीतच म्हातारी झालोय बाबा. तुमच्या चेरापुंजीच आमाला काय कवतीक,’’ असे म्हणत पावसाचे फारसे कौतुक नसल्याचे सांगितले. दुसऱ्या ओप्यात आजोबा होते. काम करणाऱ्यात वयस्कर मंडळीच अधिक असल्याबाबत विचारले तर... त्यांनी अतिपावसाकडे बोट दाखविले. असल्या पावसात नवी पोरं कधी टिकतील? हाताला आली की गाव सोडत्यात. जमल तेवढं शेतं पिकवायचं. आर्ध पाडलंय. आता आर्ध्यात रोपलावण सुरू हाय,’’ त्यांच्या जखमेवरची खपली निघाली. अर्ध्या कोसावर रोपलावणीसाठी चिखल मळणारे पॉवर ट्रिलर जणू यांत्रिकीकरणाची द्वाही फिरवत होते.
गावात पोहोचताच अतिपावसाच्या ठिकाणाची साक्ष देण्यासाठी तीव्र डहाळाच्या छपराची घरे उभी होती. रस्त्यावर माणूस नाही. राबणारी सारी शेतात. बहुतेक घरांची रखवाली कुलपांकडेच. अशा चार-पाच घरानंतर एखाद-दुसरेच घर उघडे दिसत होते. मुख्य रस्त्यावरुन डाव्या हाताला वळसा घातल्यानंतर प्राथमिक शाळा लागली. एकाच खोलीत चार वर्ग भरले होते. एक युवा शिक्षक गेली सहा वर्षे एकटेच सर्व वर्ग सांभाळत होते. सर्वाधिक पावसाचे ठिकाण, तालुक्यातील शेवटचे गाव, सुरवातीला मलाही कुठे येऊन अडकलो असे वाटत होते पण, आता मी येथे रमलोय,’’ त्यांनी सांगितले. येथील मुलांचा ‘आयक्यू’ चांगला असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. पाऊस पडू लागला की घरातच खेळायचे नाहीतर गप्प झोपून टाकायचे, असे सांगणाऱ्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर धुवाँधार पडणाऱ्या पावसाने त्या मुलांचे सगळे खेळ हिरावून घेतल्याचे दु:ख स्पष्ट दिसत होते.

ओसंडणारे समाधान
विक्रमी पावसामुळे किटवडे गाव पाणीदार आहेच; पण या गावातील माणसेही पाणीदार असल्याचा अनुभव आला. शिवारात असले तरी पाहुणचारात कमी पडली नाहीत. रोपलावणीचे काम थांबवून सोबत आणलेले पोहे खाण्याचा आग्रह करताना ताटातील घास दुसऱ्याला देण्याची दानत आणि दोन घास वाटसरूच्या पोटात गेल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारे दिसले, त्याने अनोखी ऊर्जा मिळाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76924 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top