पावसासोबत वाढतेय नदीकाठची भिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसासोबत वाढतेय नदीकाठची भिती
पावसासोबत वाढतेय नदीकाठची भिती

पावसासोबत वाढतेय नदीकाठची भिती

sakal_logo
By

35849
गडहिंग्लज : हिरण्यकेशी नदीतील पाणी पातळी वाढत असून नदीवेस परिसरातील घाटावरच्या पायऱ्या बुडाल्या आहेत. पाणी पाहण्यासाठी नागरिकांची वर्दळ वाढत आहे.

पावसासोबत वाढतेय नदीकाठची भीती
गडहिंग्लज उपविभाग; प्रशासनाची सज्जता, कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांत आज दिवसभरात पावसाचा जोर वाढला आहे. त्याबरोबरच हिरण्यकेशी, ताम्रपर्णी व घटप्रभा नदीकाठावरील कुटुंबांच्या भीतीमध्येही भर पडत आहे. पावसाचा वाढता रोख पाहता प्रशासनाने सज्जतेचा इशारा दिला आहे. नदीकाठावरील कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या सूचनाही गावपातळीवरील यंत्रणेला दिल्याचे सांगण्यात आले.
ेयंदाचा जून महिना जवळजवळ कोरडाच गेल्याची स्थिती होती. जुलैमधील पहिल्या आठवड्यात पावसाला प्रारंभ झाला. हा पाऊसही उघडझाप पद्धतीने पडू लागल्याने नद्यांमधील पाणी पातळी अजून तरी नियंत्रणात आहे. या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला आहे. गडहिंग्लजपेक्षा आजरा व चंदगडमध्ये पाऊस अधिक आहे. गडहिंग्लज तालुक्यात यावर्षी आजअखेर अजून एकदाही अतिवृष्टीची नोंद झालेली नाही. काही मंडळमध्ये पाऊस जास्त असला तरी अद्याप ओढेही आलेले नाहीत. केवळ आंबोली, आजरा परिसरात पडणाऱ्या जोरदार पावसाने येणारे पाणी हिरण्यकेशीच्या पात्रात आहे. पावसाच्या उघडझापमुळे या नदीतील पाणी पातळीही कमी-जास्त होत आहे. आज सकाळी नदीतील पाणी पातळी साडेतीन मीटरपर्यंत होती. हिरण्यकेशी नदीचे पाणी पात्रात असले तरी काठावरील कुटुंबामध्ये भीती आहे. केव्हाही स्थलांतराची वेळ येऊ शकते. यामुळे नदीकाठावरील कुटुंबे पावसाचा व नदीतील पाण्याचा अंदाज घेत सतर्क आहेत. शहरातील नदीवेस भागातील कुटुंबांनाही अलर्टच्या सूचना दिल्या आहेत. नदीघाटावरील पायऱ्या बुडाल्या आहेत.
आजरा व चंदगडमध्ये मात्र पावसाची संततधार कायम आहे. चंदगडमधील घटप्रभा नदीवरील दोन आणि ताम्रपर्णीवरील कोनेवाडी व चंदगडचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. ताम्रपणी नदीकाठावरील कोवाड बाजारपेठ मात्र भीतीच्या छायेखाली आहे. पात्रातून पाणी बाहेर आले की थेट दुकानांमध्ये शिरते. सध्या पाणी अजून पात्रात असले तरी वाढत्या पावसामुळे केव्हाही पाणी पात्राबाहेर पडू शकते. यामुळे व्यापाऱ्यांमधील भीती कायम आहे. घटप्रभा नदीवरील बंधारे खुले झाले होते; परंतु आज पुन्हा ती पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर वाढत असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

चौकट
कुटुंबांना स्थलांतरितचे आदेश
गडहिंग्लजमधील किल्ले सामानगड परिसरातील जमिनीचे गतवर्षी भूस्खलन झाले होते. जोरदार पावसाच्या पाण्याने पायवाटेवरील माती वाहून जमिनीला भेगाही पडल्या होत्या. या परिसरात राहणाऱ्या तीन कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचे आदेश तहसीलदार दिनेश पारगे यांनी दिले आहेत.

आज ऑनलाईन बैठक
गडहिंग्लज व चंदगड तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढल्याने नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. आणखीन पाच दिवस पावसाचा अंदाज आहे. पूरपरिस्थिती उद्भवल्यास तयारीच्या अनुषंगाने दोन्ही तालुक्यांतील तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, संपर्क अधिकारी, पोलिसपाटील, कोतवाल यांची उद्या (ता. १४) ऑनलाईन बैठक आयोजित केली आहे. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्याकडून आढावा घेण्यासह करावयाच्या तयारीबाबत मार्गदर्शन करणार आहेत.


तालुकानिहाय एक जूनपासूनचा पाऊस
- गडहिंग्लज : ३१९.५७ मि. मि.
- आजरा : ५७०.५७ मि.मि.
- चंदगड : ५०३.८ मि.मि.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77006 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..