प्रा. डॉ. एन. डी. पाटील लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रा. डॉ. एन. डी. पाटील लेख
प्रा. डॉ. एन. डी. पाटील लेख

प्रा. डॉ. एन. डी. पाटील लेख

sakal_logo
By

फोटो ३६३००

सत्यशोधक प्रा. डॉ. एन. डी. पाटील

महाराष्ट्रातील सर्व सामाजिक आणि पुरोगामी चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, पुरोगामी विचारवंत आणि तमाम शेतकरी, कष्टकरी जनतेचे नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे १७ जानेवारी २०२२ रोजी निधन झाले. त्यांची पहिली जयंती प्रा. एन. डी. पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आज (शुक्रवारी) होणार आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला दिलेला उजाळा...
- डॉ. टी. एस. पाटील

विद्यार्थी दशेपासूनच प्रा. डॉ. एन. डी. पाटील चळवळीत सक्रिय झाले. वडगाव येथे १९४५ मध्ये दारूबंदीसाठी निदर्शने करताना त्यांना अटक झाली आणि पंधरा दिवसांची शिक्षा झाली. हा त्यांच्या जीवनातील पहिला कारावास. त्यानंतर त्यांनी शोषणमुक्त व समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी ७५ वर्षे अव्याहतपणे काम केले. ते, डाव्या आघाडीचे नेते होतेच. त्याशिवाय रयत शिक्षण संस्था, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था (बेळगाव), महात्मा फुले शिक्षण संस्था (इस्लामपूर), डॉ. आंबेडकर ॲकॅडमी (सातारा), महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समिती, जागतिकीकरण विरोधी कृती समिती, वीजदरवाढ विरोधी कृती समिती, नर्मदा बचाव आंदोलन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, समाजवादी प्रबोधिनी (इचलकरंजी) आदी संस्था, संघटनांतून त्यांनी दिलेले योगदान परिवर्तनाचा विचार पुढे नेण्यासाठी मोलाचे ठरले. त्यांनी महात्मा फुले यांचे तत्त्वज्ञान स्वीकारले आणि त्यांना हवा असलेला समताधिष्ठित, एकजिनसी भारतीय समाज निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला.
सध्या देशाचे सार्वजनिक आणि राजकीय जीवन अनेक अंगांनी विकृत बनले आहे. आजच्या काळात शुद्ध चारित्र्य, समाजजीवनाच्या अंगांचा सर्व बाजूंनी सखोल अभ्यास करण्याची वृत्ती, तत्त्वज्ञानाशी आणि विचारसरणीशी अतूट अशी बांधिलकी, त्यागी आणि समर्पित जीवनवृत्ती, शेतकरी, कामगार व शोषित जनतेशी बांधिलकी स्वीकारून त्यांच्या कल्याणासाठी अपार कष्ट उपसण्याची तयारी समाजामध्ये अभावाने आढळते. या साऱ्या परिस्थितीचा विचार करता हे सर्व सद्‍गुण प्रा. पाटील यांच्याकडे होते, याची प्रचिती महाराष्ट्राच्या जनतेला वेळोवेळी आली आहे. प्रा. पाटील यांनी मार्क्स-लेनिनवादी विचारधारेचे अधिष्ठान स्वीकारताना त्याला महात्मा फुले, महात्मा गांधी, राजर्षी शाहू, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जोड देऊन आपले संपूर्ण आयुष्यच या एकमेव ध्येयपूर्तीसाठी मिशनरी बाण्याने व्यतित केले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जीवनावर परिणाम करणाऱ्या ज्या घटना घडल्या, त्या प्रत्येक घटनेचे प्रा. पाटील साक्षीदार आहेत. त्यांनी स्वातंत्र्यलढ्याबरोबरच गिरणी कामगार, गोवा मुक्ती, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, भूमिहिनांसाठी भूमी, शेतीमालाला किफायतशीर भाव, कापूस एकाधिकार योजना, महागाई आणि उपासमारविरोधी आंदोलन, बहुजनांच्या शिक्षणासाठी श्वेतपत्रिकेविरोधातील लढा, अंधश्रद्धा निर्मूलन, धरणग्रस्त, वीज दरवाढ, एन्रॉन हटाव, खासगीकरण, समन्यायी पाणी वाटप, सेझविरोधी आंदोलनापासून ते कोल्हापुरातील टोलविरोधी आंदोलनाचेही नेतृत्व केले आणि ही आंदोलने यशस्वी झाली. थोडक्यात, काही सन्माननीय अपवाद वगळता महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंच्या विचारांचा सच्चा वारसदार म्हणून फक्त प्रा. पाटील यांचेच नाव घ्यावे लागते, हे नक्की.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77107 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top