
रेस्क्यू करू पण ठेवणार कुठे ?
रेस्क्यू केलेल्या जनावरांना ठेवणार कुठे?
प्राणीप्रेमी संघटनांसमोर प्रश्न; गोडावून, शेड तात्पुरत्या निवारा स्वरूपात देण्याची अपेक्षा
सुयोग घाटगे : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : शहर व उपनगर परिसरात तसेच पूर परिस्थितीमधून स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवलेली जनावरे ठेवण्याचा मोठा प्रश्न प्राणीप्रेमींसमोर आहे. यातून नेमका मार्ग निघत नसल्यामुळे नेमके करावे काय असे वाटत असताना प्राण्यांवरील प्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नाही.अनेकवेळा बेवारस फिरणारी जनावरे आढळून येतात. यात काही शारीरिक विकलांग किंवा अपघाताने जायबंदी झालेली असतात. अशातच त्यांच्यावर उपचार व्हावेत अथवा त्यांना निवारा मिळावा या हेतूने अनेकजण प्राणीप्रेमी संस्थेशी संपर्क साधून या जनावरांची सोय करण्याचा प्रयत्न करतात. प्राणीप्रेमीही येतात आणि अशा प्राण्यांना घेऊन जातात. सगळेजण खूश होऊन टाळ्या कुटतात आणि पुण्याचे काम केले असते समजून निघून जातात. वास्तवात प्राणीप्रेमींसमोर खरी समस्या येथून पुढे निर्माण होताना दिसत आहे. एखादे जनावर घेऊन गेल्यानंतर जागेअभावी संस्थेशी संलग्न असणाऱ्या अनेकांनी आपल्या घरात नेऊन ठेवल्याची उदाहरणे सध्या कोल्हापूरमध्ये आहेत. अशा प्राण्यांवर उपचार, अन्न व निवारा ते स्वतः देत आहेत. काही दानशूर अधूनमधून त्यांना मदत करतात. मात्र, याहूनही मोठा प्रश्न रेस्क्यू केलेल्या प्राण्यांच्या निवाऱ्याचा बनत आहे. आणि हा प्रश्न कधीही न संपणारा असा आहे.
शहरात घोडे, गाय, बैल, कुत्रा, मांजर यांसह अनेक प्राण्यांचे रेस्क्यू केले जाते. अनेक संस्था यासाठी काम करत आहेत. असे असले तरीही त्यांच्याकडे प्राण्यांना ठेवण्यासाठी निवारा केंद्राची आवश्यकता आहे. सध्या पूर परिस्थितीमुळे अनेक प्राण्यांना रेस्क्यू केले जात आहेत. हे सगळे प्राणी उपचार करून ठेवायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरामध्ये अनेक इमारती अशा आहेत ज्या ठिकाणचे बांधकाम अनेक वर्षांपासून बंद आहे. तेथे अथवा एखाद्या शेड अथवा हॉलमध्ये काही तात्पुरती निवारा केंद्र होणे शक्य आहे. अशी ठिकाणे असल्यास काही महिन्यांसाठी ती प्राणीप्रेमी संस्थांना उपलब्ध झाल्यास यातून अनेक प्राण्यांचा जीव वाचवण्यास हातभार लागू शकतो.
कोट
आम्ही आमच्या क्षमतेच्या पुढे जाऊन प्राण्यांचा जीव वाचवण्याचा नेहमी प्रयत्न करतो. अनेक दानशूर व्यक्ती औषध व अन्नासाठी मदतही करतात. मात्र, एखाद्याने गोडावून अथवा शेड तात्पुरत्या निवारा स्वरूपात उपलब्ध करून दिल्यास या कार्यात अधिक हातभार लाभेल.
-प्रशांत साठे, पप्पूदा ॲनिमल रेस्क्यू
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77607 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..