
सुक्ष्म नियोजनाबद्दल यंत्रणांचे कौतुक
36370
पूर व्यवस्थापनाचा परिपूर्ण प्रस्ताव द्या
राजेश क्षीरसागर; सूक्ष्म नियोजनाबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुक
कोल्हापूर, ता. १५ : भविष्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास अडचण भासू नये, यादृष्टीने पूर व्यवस्थापनासाठी सर्व विभागांना आवश्यक साधनसामग्री आणि उपाययोजनांचा समावेश असणारा परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्याची सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली. वाढते पर्जन्यमान, दोन पुरांचा अनुभव व सद्यस्थिती याबाबत पूर व्यवस्थापन नियोजन आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यलयामध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, इचलकरंजी महानगरपालिकेचे प्रशासक सुधाकर देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
श्री क्षीरसागर म्हणाले, ‘‘अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे गडकोट, किल्ल्यांचे बुरुज ढासळून नुकसान होऊ नये तसेच ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन व्हावे, यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेवून धोकादायक इमारती, पूरबाधित क्षेत्रातील नागरिक, जनावरे व या भागातील रुग्णालयांमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे तात्काळ स्थलांतर करा.’’
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या समन्वयाने यंत्रणांनी पूर व्यवस्थापनासाठी सुक्ष्म नियोजन केल्याबद्दल कौतुक केले. जिल्हाधिकारी रेखावार यांनी संभाव्य पूरस्थिती नियंत्रणासाठी शासन सज्ज असल्याचे सांगत विविध विभागांचे नियंत्रण कक्ष कार्यान्वित असल्याचे सांगितले.
आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पूरबाधित क्षेत्रातील धोकादायक इमारतीमधील नागरिक, रुग्ण व नातेवाईकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. मदत व पुनर्वसनासाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी पूरबाधित गावांमधील नागरिकांचे मागील वर्षी स्थलांतर केले होते. यावर्षीही संभाव्य स्थिती पाहता नियोजनबद्ध कार्यवाही करण्यात येत आहे. आरोग्य सुविधा, प्रथमोपचारासाठी आरोग्य पथके, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, साफसफाई, आदींसाठी विविध पथके तयार केल्याचे सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77663 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..