
दलित वस्ती निधीच्या ठरावांची पळवापळवी
जिल्हा परिषदेतून...
दलित वस्ती निधीच्या
ठरावांची पळवापळवी
तक्रारीसाठी जिल्हा परिषदेकडे धावाधाव
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून ४० कोटी निधीचे वाटप केले. राजकीय हस्तक्षेपाशिवाय वंचित वस्त्यांना निधी देण्याचा निर्णय प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी घेतला. मात्र हा निर्णय काही माजी सदस्यांना पटला नसल्याने त्यांनी गावागावात आपणच निधी मंजूर केल्याचे सांगून ठराव गोळा करीत आहेत. त्यामुळे गावागावात वाद लागण्यास सुरुवात झाली आहे. दलितवस्तीप्रमाणेच जल जीवन मिशनमधील योजनांबाबतही असाच श्रेयवाद सुरू आहे.
दरवर्षी दलित वस्तीच्या विकासासाठी समाजकल्याण विभागाकडून निधी दिला जातो. मात्र हा निधी देताना राजकीय हितसंबंध, मतदान, लाभहानी याचा विचार करुन निधी वाटप होतो. त्यामुळे जिथे मतदान मिळत नाही तेथे निधी दिला जात नाही. मागील पाच वर्षात ६६८ दलित वस्तींना एकही रुपया दिला नाही. काहींना अगदीच थोडका निधी दिला गेला. मात्र जिल्हा परिषदेवर प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतर श्री. चव्हाण यांनी ज्या वस्त्यांना निधी मिळाला नाही, त्यांना निधी देण्याचे नियोजन केले. ग्रामसेवक, गट विकास अधिकारी यांना आदेश देऊवून वंचित दलित वस्त्यांची माहिती संकलित केली. कमी निधी दिलेल्या वस्त्याही शोधून काढून त्यांना निधी देण्याचे काम केले.
दलित वस्तीची यादी मंजूर केल्यानंतर ती गावाला पाठवली. ततूपुर्वी काही माजी सदस्यांनी यादी ताब्यात घेत आपणच निधी मंजूर केल्याचे सांगण्यास सुरुवात केली. अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपणच गावांचा समावेश करण्यास सांगितले असल्याचे सांगत ठराव संकलित करण्यास सुरुवात केली. परस्परच गावांचे ठरावही गोळा केले. गगनबावडा व करवीर तालुक्यातील काही ग्रामस्थांनी याबाबत तक्रार केली आहे. पाणी पुरवठ्याबाबतही असाच प्रकार सुरू असल्याने अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच गोची होताना पहायला मिळत आहे. या सर्वावर आता सत्ता बदलाचाही परिणाम झाला आहे. काही लोकप्रतिनिधींनी तर ही कामेच थांबवण्याची मागणी केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77697 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..