
इचल : टुडे पान एकसाठी
साध्या यंत्रमागधारकांना ‘अच्छे दिन’ कधी?
राज्य शासनाने ठोस पावले उचलली नसल्याची चर्चा; सत्तांतरामुळे आशा पल्लवीत
पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १६ ः विविध संकटामुळे राज्यातील यंत्रमाग उद्योग हळूहळू अस्थिर होत आहे. या उद्योगाला सावरण्यासाठी दोन्ही राज्य शासनांनी ठोस पावले उचलली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा उद्योग पुढील काळात ठिकणार की नाही, अशी भाती व्यक्त होत आहे. विशेष करून साध्या यंत्रमागधारक ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील सत्तांतरामुळे या उद्योगाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. किमान या सरकारकडून तरी यंत्रमाग उद्योगाला बूस्टर डोस मिळेल, अशी आस लागून राहिली आहे.
देशात सुमारे २० लाख साधे यंत्रमाग आहेत. यातील सुमारे १० लाख यंत्रमाग एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत. एकेकाळी कामगारांना मालक बनविणारा हा उद्योग म्हणून पाहिले जात होते. आता मात्र प्रचंड अस्थिर वातावरणामुळे मालकाचा कामगार होण्याची वेळ आली आहे. विविध संकटाशी सामना करीत हा उद्योग मार्गक्रमण करीत आहे. इचलकरंजीसारख्या वस्त्रनगरीत आता अनेकजण या उद्योगाला पर्याय शोधत आहेत, तर काहीजण हा पारंपरिक उद्योग टिकविण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे कितीही संकटे आली तरी त्यातून मार्ग काढण्यासाठी यंत्रमाग उद्योजक धडपड करीत असल्याचे चित्र आहे.
शेतीपाठोपाठ रोजगार देणारा वस्त्रोद्योग आहे. त्यामुळे यापूर्वी या उद्योगाला शासनाकडून नेहमीच साहाय्य मिळाले आहे; पण तत्कालीन भाजप-शिवसेना युती सरकार व त्यानंतर आलेले महाविकास आघाडीकडून अपेक्षित मदत मिळाली नसल्याची भावना व्यक्त होत आहे. साध्या यंत्रमाग उद्योजकांचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. शासनाच्या बूस्टर डोसशिवाय हा उद्योग गती घेऊ शकणार नाही, अशीच परिस्थिती आहे. शिंदे- फडणवीस सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे पुढील काळात या उद्योगाल मोठी मदत होईल, अशा आशा व्यक्त होत आहे.
--
चौकट
आधुनिकतेकडे जाताना..
साध्या यंत्रमागातून आधुनिक यंत्रमागाकडे प्रवास सुरू आहे. यासाठी केंद्र शासनाने सन १९९५ पासून `टफ्स` ही महत्त्वकांक्षी योजना राबवली. यातून गेल्या २७ वर्षांत अपेक्षित आधुनिक यंत्रमाग आल्याचे दिसत नाही. त्यामुळे आजही साध्या यंत्रमागावरच अनेक यंत्रमाग केंद्रांचा डोलारा सुरू आहे. त्यामुळे आधुनिकतेकडे जातांना साध्या यंत्रमागाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
चौकट
५ टक्के व्याज अनुदान प्रस्ताव मार्गी लावा
साध्या यंत्रमागांसाठी विविध ठोस उपाययोजना शासनाकडून केल्या जाव्यात, अशी अपेक्षा आहे. ५ टक्के व्याज अनुदानाचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावले पाहिजेत. या शिवाय स्थिर वीजदरसह अन्य काही उपाययोजना केल्यास या उद्योगाला पुन्हा भरभराटी राहूदे किमान हा उद्योग टिकून राहील.
चौकट
खर्चीवाले यंत्रमागधारकांना संरक्षणाची गरज
कामगारांना कायद्याचे संरक्षण आहे; पण मजुरी बेसवर कापड विणून देणाऱ्या खर्चीवाल्यांना मात्र कोणतेच कायद्याचे संरक्षण नाही. त्यामुळे त्यांची ट्रेडिंगधारकांकडून पिळवणूक होत असल्याची चर्चा आहे. त्यांना कायद्यानुसार संरक्षण मिळेल, अशी तरतूद शासनाकडून करण्याची गरज आहे.
चौकट
किमान ५ वर्षे वीजदर स्थिर आवश्यक
साध्या यंत्रमागाबरोबरच अत्याधुनिक यंत्रमाग (अॅटोलूम) कारखान्यांची संख्या वाढत आहे; पण या उद्योगासमोर वीज दरातील अस्थिरता त्रासदायक ठरत आहे. ५० टक्के उत्पादन खर्च वीज दरावर खर्ची पडत आहे. पण त्यानंतरही वीज दरातील गोंधळांमुळे अॅटोलूमधारकही त्रस्त आहेत. त्यांची यातून सुटका करण्यासाठी किमान पाच वर्षे वीजदर स्थिर ठेवणे आवश्यक आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77999 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..