
धनगरवाड्यावर विकास पोहोचणार कधी
36824
हरपवडे धनगरवाडा
धनगरवाड्यांवर विकास पोहोचणार कधी?
प्रशासनाकडून केवळ दखल; किटवडे, हरपवडेत मूलभूत सुविधांचा अभाव
रणजित कालेकर : सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १८ : हरपवडे (ता. आजरा) येथील धनगरवाड्यांवर आरोग्य सुविधा पोहोचविताना आरोग्य कर्मचाऱ्यांची होत असलेली कसरत सोशल मीडियावर प्रसारित झाल्यावर प्रशासन हलले आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकारी हरपवडे धनगरवाड्यांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा तालुक्यातील सर्व धनगरवाडे चर्चेत आले आहेत. मोठ्या साहेबांची ये-जा पाहून धनगर बांधवही अचंबित झाले आहेत. देशात एकीकडे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना आजही अनेक धनगरवाड्यांवर स्वातंत्र्याचा सूर्य उगवला नसल्याचे चित्र आहे. धनगर बांधव आजही संघर्षाचे जीणे जगत आहेत. तालुक्यातील सात धनगरवाड्यांपैकी किटवडे, हरपवडे हे धनगरवाडे मूलभूत सुविधांपासून वंचितच आहेत. प्रशासनाकडून त्यांची दखल घेतली जाते; पण पुढे त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.
तालुक्यात आवंडी १, २, ३, मोरेवाडी, चितळे, किटवडे व हरपवडे धनगरवाडा हे सात धनगरवाडे आहेत. यांपैकी मोरेवाडी, चितळे, आवंडी १ व २ या धनगरवाड्यांवर बऱ्यापैकी मूलभूत सुविधा झाल्या आहेत. वीज, पिण्याचे पाणी, रस्ता उपलब्ध आहे. आवंडी क्रमांक ३ वर रस्ता नाही. किटवडे, हरपवडे हे वीज, रस्त्याच्या सुविधांपासून वंचित असून अन्य मूलभूत सुविधा तेथे पोहोचलेल्या नाहीत. धनगर बांधवांची किमान रस्ता, वीज, पाणी द्या अशी मागणी आहे. त्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. हरपवडे धनगरवाड्यांवर आमदार प्रकाश आबिटकर यांनी रस्ते व वीज पोहोचवण्यासाठी मध्यंतरी प्रयत्न केला; पण वन विभागाच्या जाचक अटीत रस्ता व वीज अडकली. आजही येथील रहिवाशांना दऱ्या-खोऱ्यातून पायपीट करत शहरांकडे यावे लागते. आरोग्य सुविधा मिळवताना रुग्णांचे हाल होतात. हरपवडे धनगरवाड्यांची प्रशासनाने घेतलेली दखल पाहता धनगर बांधवांचे जीवन सुखकर होण्याची आशा पल्लवीत झाली आहे.
--------------
चौकट
हरपवडेत वन हक्काची प्रक्रिया हवी
आजरा तालुक्यात वन हक्काचे ८५ दावे केले होते. हे सर्व आवंडी धनगरवाड्यांवरील आहेत. यांपैकी २० मंजूर झाले आहेत. अन्य दाव्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे फेर अर्ज केला आहे. काही त्रुटी निघाल्या आहेत. त्यांची पूर्तता सुरू आहे. हरपवडे धनगरवाड्यांच्या वन हक्काच्या दाव्यांची रितसर प्रक्रिया होणे गरजेचे आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78374 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..