अतिदुर्गम धनगरवाड्यावर नेमणार ''आरोग्य दूत'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिदुर्गम धनगरवाड्यावर नेमणार ''आरोग्य दूत''
अतिदुर्गम धनगरवाड्यावर नेमणार ''आरोग्य दूत''

अतिदुर्गम धनगरवाड्यावर नेमणार ''आरोग्य दूत''

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद
36949
अतिदुर्गम वाड्यावर नेमणार ‘आरोग्य दूत’
आरोग्य विभागाचा प्रस्‍ताव; सुविधांच्या अभावामुळे मृत्यूशी गाठ
सदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १८ : जिल्‍ह्यातील दुर्गम वाडीवस्‍तीवर व विशेषत: धनगरवाड्यांवर सोयी-सुविधांचा अभाव असल्याने दरवर्षी अपघात घडत असतात. सर्पदंश, प्राण्यांचा हल्‍ला होण्यापासून ते रस्‍त्यांचा अभाव आणि वाहतुकीची व्यवस्‍था नसल्याने गरोदर मातांचा मृत्यू झाल्याचीही उदाहरणे आहेत. जिल्‍ह्यातील १०८ पैकी ५५ वाड्या या अतिदुर्गम आहेत. यात बहुतांश धनगरवाड्यांचा समावेश आहे. त्यामुळेच आरोग्य विभागाने अशा अतिदुर्गम वाड्यावस्‍त्यांवर आरोग्य दूत नेमण्याचा निर्णय घेतला आहे. किमान काही आरोग्याच्या सुविधा उपलब्‍ध झाल्या, तर माणसांच्या जिवावर बेतणार नाही, एवढी सुविधा देण्याच्या हेतूने आरोग्य विभाग नियोजन करत आहे. जर इतर विभागांनीही थोडेसे नियोजन केले तर या दुर्गम वाड्यावस्‍त्यावरील जीवन सुसह्य होणार आहे.

राज्यातील प्रगत, दरडोई उत्‍पन्‍नात अग्रेसर, सहकाराचे भक्‍कम जाळे असणारा जिल्‍हा अशी कोल्‍हापूरची ओळख आहे, मात्र याच जिल्‍ह्यात अनेक दुर्गम वाड्यावस्‍त्याही पायाभूत सुविधांसाठी झगडत आहेत. रस्‍ते नसल्याने रुग्‍णांना, गरदोर मातांना झोळीतून रुग्‍णालय गाठावे लागते. यामध्ये अनेकांना प्राणही गमावावा लागतो. कधी सर्पदंश तर प्राण्यांचा हल्‍ला होण्याचेही प्रकार सतत होतात. त्यातूनही काही सुविधा द्यायच्याच झाल्यास कधी वन विभागाचातर कधी शासनाच्या विभागांची अनास्‍था पाहायला मिळते.
दुर्गम वाडीवस्‍त्यांवर सर्दी, पडसे तर सोडाच पण ताप, रक्‍तदाब, शुगरचे रुग्‍णही अपवादानेच सापडतात; मात्र लहान मुलं, गरोदर माता यांना उपचाराची गरज भासते. सर्पदंश, प्राण्यांचा हल्‍ला झाला तर तत्‍काळ प्रथमोपचार गरजेचे असतात. स्‍थानिकांना प्रशिक्षण देऊन या सुविधा देणे शक्य आहे. या मागणीची आरोग्य विभागाने गांभीर्याने दखल घेत प्रस्‍ताव तयार केला आहे. यावर प्रशासकांची मोहोर उठल्यास दुर्गम वाड्यावस्‍त्यांना दिलासा मिळणार आहे.
....
जिल्ह्याच्या पश्‍चिम घाटात अनेक वाड्यावस्‍त्या या अतिदुर्गम आहेत. सोयी-सुविधा नसल्यानेही तेथील लोकांना प्राण गमवावा लागतो. किमान सोयी-सुविधा देण्यासाठी आरोग्य विभागाचे नियोजन सुरू आहे. यासाठी आरोग्य दूत नेमण्याचे नियोजन आहे. त्याच्या माध्यमातून आरोग्याच्या सुविधा दिल्या जातील, तर इतर विभागांनीही पाण्याची, रस्‍त्यांची, स्‍वच्‍छतेची सुविधा दिली तर तेथील लोकांचे जीवन अधिक सुसह्य बनेल.
-डॉ. योगेश साळे, जिल्‍हा आरोग्य अधिकारी.

कोट
स्‍वातंत्र्यानंतरही दुर्गम वाड्या, वस्‍त्या मागासच आहेत. ना रस्‍ता, ना ॲम्‍ब्युलन्‍सची सोय. दरवर्षी वाहतूक व आरोग्याच्या सुविधा न मिळाल्याने चार, पाच मृत्यू होतात. असे किती वर्षे चालणार, म्‍हणूनच आरोग्यदूत नेमावेत, अशी मागणी दोन वर्षे करत आहोत. या वस्‍तीवर किमान शिक्षण झालेल्या व्यक्‍तीला आरोग्य दूताचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत सुविधा देणे शक्य आहे.
- संजय वाघमोडे, अध्यक्ष, यशवंत क्रांती सेना.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78480 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..