
बेकायदा गुरे वाहतुकीचा पर्दाफाश
36992
बांदा ः येथे जप्त केलेली गुरे वाहतूक करणारी गाडी.
बेकायदा गुरे वाहतुकीचा पर्दाफाश
बांद्यात पकडले; कोल्हापुरातील तरुणावर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १८ ः मुंबई-गोवा महामार्गावर बांदा कट्टा कॉर्नर येथे गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने बेकायदा गुरांची वाहतूक करणाऱ्या आनंदा पाटील (वय ३८, रा. कागल, जि. कोल्हापूर) याच्याविरोधात बांदा पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तीन गायी व एक वासराला बिचोली-गोवा येथील गोशाळेत स्थलांतरित केले. बांदा शहरातील जागरूक नागरिकांनी गुरांच्या बेकायदा वाहतुकीचा पर्दाफाश केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी कीः गोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने गुरांची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती बांदा शहरातील काही जागरुक नागरिकांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी रात्री साडेदहा वाजता महामार्गांवर कट्टा कॉर्नर येथे सापळा रचण्यात आला. बोलेरो पिकअप (एमएच ०९ ईएम ००७६) तपासणीसाठी थांबविण्यात आली. त्यावेळी मागील हौद्यात तीन गायी व एक वासरू आढळले. स्थानिकांनी चौकशी केली असता चालक समर्पक उत्तरे देऊ शकला नाही. चालकाच्या बोलण्यावरून गायींची तस्करी होत असल्याचा संशय आल्याने लोकांनी बांदा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस निरीक्षक शामराव काळे यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. ग्रामस्थ्यांच्या मागणीनुसार गुरे वाहतूक करणारी गाडी पोलिस ठाण्यात नेण्यात आली. बांदा पोलिसांनी गुरांची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत गाडी जप्त केली. गुरांना स्थानिकांच्या मदतीने गोव्यातील गोशाळेत स्थलांतरित करण्यात आले. यावेळी माजी सभापती शीतल राऊळ, नीलेश सावंत-पटेकर, शामू धुरी यांच्यासह स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78608 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..