इचलकरंजीत शिवसेना दुभंगणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत शिवसेना दुभंगणार?
इचलकरंजीत शिवसेना दुभंगणार?

इचलकरंजीत शिवसेना दुभंगणार?

sakal_logo
By

इचलकरंजीत शिवसेना दुभंगणार?
खासदार मानेंच्या भूमिकेचा परिणाम; वस्त्रनगरीचे राजकारण नव्या वळणावर
इचलकरंजी, ता. १९ ः राज्य पातळीवरील राजकारणातील भूकंपाचे धक्के आता वस्त्रनगरीपर्यंत पोहचले आहेत. खासदार धैर्यशील माने हे अपेक्षेप्रमाणे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्याचे दूरगामी परिणाम वस्त्रनगरीतील राजकारणावर जाणवणार आहेत. या घडामोडीनंतर शहर शिवसेनेतील एक गट खासदार माने यांच्यासमवेत शिंदे गटासोबत जाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पुढील काळात शहर शिवसेनेची ताकद दुभंगण्याची शक्यता आहे.
शहरात शिवसेनेचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात शिवसेनेला नेहमीच महत्व राहिले आहे. कमी-अधिक प्रमाणात या पक्षाचे पालिका सभागृहात अस्तित्व राहिले आहे. लोकसभा निवडणूकीपूर्वी धैर्यशील माने यांच्या एंट्रीनंतर शहर शिवसेनेला अधिक बळ मिळाले. त्यांच्या कट्टर समर्थकांनीही त्यांच्यासमवेत शिवबंधन बांधले. त्यामुळे दोन - तीन वर्षांत शिवसेना अधिक सक्रिय होत गेली. गेली अडीच वर्षे या पक्षाचा मुख्यमंत्री असल्यामुळे विविध ठिकाणी शिवसेनेचे ठळक अस्तित्व दिसून येत होते.
राज्यस्तरावरील सत्तांतराचा फारसा फरक शहर शिवसेनेत पडला नाही. मात्र, खासदार माने यांनी आज शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजताच शहर शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. तातडीने बैठक घेऊन मूळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला. यामध्ये बहुतांशी शिवसेनेतील जुन्या गटाचा समावेश होता. तर त्या बैठकीला खासदार माने समर्थकांचा नवा गट गैरहजर राहिला. त्यामुळे हा गट शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. पुढील एक - दोन दिवसांत याबाबतचे नेमके चित्र समोर येऊ शकते.
-----

महापालिका निवडणुकीत होणार नव्या जोडण्या
इचलकरंजी महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक येत्या काही महिन्यांत होणार आहे. खासदार माने यांच्या बदललेल्या भूमिकेनंतर नवीन राजकीय समीकरणे उदयास येणार आहेत. मुळात भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्याकडे खासदार माने यांचा नेहमीच ओढा राहिला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपबरोबर खासदार माने यांचा गट युती करण्याची दाट शक्यता आहे.
----------

शिंदे गटाला बळ मिळणार
खासदार माने यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय शहरातील अनेकांना सोयीचा ठरणार आहे. सध्या विविध राजकीय पक्षांत अपेक्षित संधी मिळत नसल्याने प्रवाहातून बाजूला असणारे अनेकजण शिंदे गटात सहभागी होऊन सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्राधान्याने अनेक माजी नगरसेवकांचा समावेश असू शकतो. खासदार माने यांच्या भूमिकेला माजी नगरसेवक रवींद्र माने, माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
-----------

महापालिकेसाठी शिंदे यांचे सहकार्य
इचलकरंजी महापालिका करण्याचे मोठे आव्हान खासदार माने यांच्यासमोर होते. त्यांनी याबाबत पाठपुरावा सुरू केल्यानंतर सुरुवातीपासून तत्कालीन नगरविकास मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे सहकार्य केले. त्यांचे सहकार्य मिळाले नसते, तर महापालिका होणे अशक्य होते. त्यामुळे खासदार माने हे शिंदे गटात सहभागी होणार असल्याची सुरुवातीपासून चर्चा सुरू होती. अखेर त्यावर आज शिक्कामोर्तब झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78976 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..