गडहिंग्लजला घरोघरी डासांच्या अळ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला घरोघरी डासांच्या अळ्या
गडहिंग्लजला घरोघरी डासांच्या अळ्या

गडहिंग्लजला घरोघरी डासांच्या अळ्या

sakal_logo
By

37433

घरोघरी डासांच्या अळ्या
गडहिंग्लजला सर्वेक्षणातून स्पष्ट; डेंगी-चिकनगुण्‍या वाढतोय, नागरिकांच्या प्रबोधनावर हवा भर
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २० : शहरातील घराघरांत स्वच्छ पाण्याच्या साठवण भांड्यांमध्ये डासांच्या अळ्या सापडत आहेत. दोन दिवसापासून सुरू असलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीवरून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे आता नागरिकांच्या पातळीवर घरोघरी जाऊन प्रबोधनावर भर देणे आवश्यक बनले आहे. शहरात डेंगी व चिकनगुण्‍याच्या वाढत्या रुग्णसंख्येचे मूळ घरातच असल्याने नागरिकांनी आता आपल्या घरातूनच स्वच्छतेचा मार्ग अवलंबला पाहिजे.
दोन महिन्यांपासून शहरात डेंगी व चिकनगुण्‍या सदृश लक्षणांचे रुग्ण आढळत आहेत. सुरूवातीला ठराविक भागात असलेला हा आजार आता शहरभर पसरला आहे. घरपती एक रुग्ण अशा लक्षणांचा असल्याचे चित्र आहे. यामुळे शहरवासीयांतून पालिका व आरोग्य यंत्रणेवर निष्काळजीपणाचा आरोप वाढू लागला आहे. हे गांभीर्य ओळखून प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. त्यामुळे आता सोशल मीडियासह नागरिकांतून उमटणाऱ्या संतापाची प्रशासन वाट पाहत होती का, असा उलट प्रश्‍नही विचारला जात आहे. आजाराचे गांभीर्य ओळखून सुरूवातीलाच प्रशासनाने प्रबोधनाची मोहीम हाती घेतली असती तर आज ही साथ आटोक्यात असती.
जूनमधील शेवटच्या आठवड्यात एक सर्वेक्षण झाले. या सर्वेक्षणात घरोघरी अळ्या आढळण्याचे प्रमाण कमी होते. पंधरावड्यानंतर सुरू केलेल्या फेर सर्वेक्षणात मात्र घराघरांतील पाणी साठ्यात डास अळ्या सापडत आहेत. यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहिले पाहिजे. घरातील पाणी साठवणीच्या भांड्यांकडे लक्ष द्यायला हवे. ११ पथकात एकूण ८० हून अधिक कर्मचारी व नर्सिंग प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. एकाचवेळी सर्व प्रभागात सुरू असलेल्या सर्वेक्षणात अळ्या आढळणाऱ्या घरामध्ये औषध फवारणी, साठवण टाकीत औषध सोडले जात आहे. आजाराची तीव्रता लक्षात येण्यासाठी सर्वेक्षण गरजेचे असले तरी दुसऱ्या बाजूने नागरिकांचे प्रबोधन मोहीमही आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत नागरिकांना प्रोत्साहीत करण्याची गरज आहे. केवळ बैठका आणि सर्वेक्षणातून ही साथ हटणार नसून प्रशासनाने वॉर पूटिंगवरच प्रबोधन हाती घ्यायला हवे.

चौकट...
नागरिकांनी हे करावे...
- फ्रीजमागील पाण्याचा ट्रे वारंवार स्वच्छ करावा
- घराच्या आवारात पडलेले विनावापराचे साहित्य भंगारात द्यावे
- पाण्याच्या टाक्यांमध्ये गप्पी मासे सोडावेत
- किरकोळ ताप अंगावर काढू नये. तत्काळ रक्त तपासणी करून घ्यावी.
- ताप, सांधेदुखी असेल तर सकस आहार घ्यावा. पाणी जास्त प्यावे.
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्यावीत

स्वच्छ पाण्यातच अळ्या
डेंगी व चिकनगुण्‍या आजाराला कारणीभूत असलेला एडिस इजिप्ती हा डास स्वच्छ पाण्यातच अंडी घालतो. त्यासाठी आताचा काळ पोषक आहे. या डासाचे जीवनचक्र सात दिवसाचा असतो. यामुळे आठवड्यातून एकदा फ्रीजमागील ट्रेसह पाणीसाठ्याच्या इतर भांडी कोरडे करावेत. जेणेकरून या डासाच्या उत्पत्तीची साखळी तुटून नवे डास तयार होणार नाहीत. घर परिसरातील नारळ, करवंट्या, जुन्या टायरी, काचेच्या भांड्यांचे फुटलेले तुकडे, जुने डबे काढून भंगारात द्याव्यात किंवा त्याची विल्हेवाट लावावी. या डासांची उत्पत्ती थांबविणे हाच साथ रोग आटोक्यात आणण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याने कोरडा दिवस महत्त्‍वाचा आहे.

काय सांगते सर्वेक्षण
- १७ ते २३ जून : ११७१ कुटुंबांचे सर्वेक्षण : ४१ घरांमध्ये डास अळ्या
- १९ जुलै : ४४६ कुटुंबांचे सर्वेक्षण : १०७ घरात डास अळ्या
- २० जुलै : ६६१ कुटुंबाचे सर्वेक्षण : १६१ घरांमध्ये डास अळ्या

कोट...
ग्रामीण आरोग्य यंत्रणा सोबत घेऊन सर्वेक्षण सुरू आहे. घंटागाडीसह इतर माध्यमातून प्रबोधन सुरू केले आहे. सर्वेक्षणात बहुतांशी घरांतच अळ्या सापडत आहेत. तेथे प्रतिबंधात्मक औषधे, फवारणी सुरू आहे. नागरिकांनीही स्वच्छतेचा मार्ग अवलंबवावा. मोफत आरोग्य शिबिरेही घेत आहोत. सर्व डॉक्टर्स, तरुण मंडळे, बचत गट, स्वयंसेवी संघटना, नागरिकांनी यंत्रणेला सहकार्य केल्यास निश्‍चित ही साथ अटोक्यात येईल.
- स्वरुप खारगे, मुख्याधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79223 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..