ओबीसी महापालिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओबीसी महापालिका
ओबीसी महापालिका

ओबीसी महापालिका

sakal_logo
By

महापालिका फोटो

महापालिकेत ओबीसींना २१ जागा
निवडणूक आयोगानुसार निर्दशानुसार ठरणार ; नव्याने निघणार आरक्षण सोडत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः शहराच्या ओबीसी २३. ११ टक्के लोकसंख्येनुसार महापालिकेत ९२ जागांपैकी २१ जागा ओबीसींना मिळतील.
तर बांटिया आयोगाच्या शिफारनुसार २२ मिळू शकतील. खुल्या प्रवर्गातील जागा ५८ होणार आहेत. यापूर्वीची आरक्षण सोडत रद्द केल्याने नवीन सोडत काढण्यात येणार असून, त्यातून ओबीसी तसेच इतर प्रवर्गातील महिलांचे आरक्षण टाकले जाणार आहे. राज्य निवडणूक आयोग नवीन सोडतीची तारीख निश्‍चित करणार आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शानुसार ओबीसी जागा निश्चित होणार आहेत.
महापालिका क्षेत्रातील ओबीसींची टक्केवारी २३. ११ टक्के असल्याने यानुसार आरक्षण द्यायचे झाल्यास काही जागा कमी होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकार त्रिस्तरीय चाचणी करून ओबीसींचे प्रमाण निश्‍चित करेपर्यंत ओबीसी जागांशिवाय निवडणूक घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
राज्य निवडणूक आयोगाला जिथे पाऊस नाही, तिथे निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले होते. कोल्हापूरसह १३ महापालिकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला. त्यानुसार ३१ मे रोजी झालेल्या सोडतीत ओबीसीशिवाय आरक्षण टाकले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सरकारने ओबीसी डाटा सादर केल्याने ओबीसींना संधी मिळेल, अशी शक्यता होती. त्यानुसार आज न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याचा मार्ग खुला केला.
या आदेशानुसार नवीन सोडत काढली जाणार आहे. महापालिकेच्या ९२ जागांपैकी अनुसूचित जातीच्या १२ जागा, अनुसूचित जमातीची एक जागा अशा १३ जागा लोकसंख्येनुसार निश्‍चित केल्या आहेत. गेल्या सोडतीत जमातीची एकच जागा पुरुष प्रवर्गासाठी गेली होती. नवीन सोडतीत ती कोठे जाईल, याची उत्सुकता आहे. तसेच अनुसूचित जातीच्या १२ जागांपैकी महिलांसाठीच्या निम्म्या जागांसाठी पुन्हा सोडत काढावी लागेल. ओबीसी नसताना ७९ जागा खुल्या प्रवर्गासाठी होत्या. नवीन आरक्षणानुसार त्यातील २१ जागा ओबीसीसाठी जातील. त्यात महिलांसाठी ५० टक्के जागांसाठी सोडत निघेल. शिल्लक ५८ जागा खुल्या प्रवर्गासाठी असतील. त्यातील २९ जागांसाठी महिलांचे आरक्षण काढण्यात येईल. महापालिकेने मतदार यादी अंतिम केली आहे. त्यामुळे आता निवडणुकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम राबवला जाणार होता.

सप्टेंबरअखेर निवडणुकीची शक्यता
सध्या सोडतीचा कालावधी सोडल्यानंतर ४० दिवसांचा निवडणूक कार्यक्रम राबवला तर सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होऊ शकते. पावसाबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असून, त्याचाही विचार करून कोल्हापूरच्या निवडणुकीची तारीख निश्‍चित केली जाऊ शकते. तसेच प्रभाग रचना बदलाबाबतही काही निर्णय घेतला गेल्यास त्याचा परिणाम होऊ शकतो. शासकीय अधिकाऱ्यांच्या मतानुसार आता महापालिचेची प्रभाग रचना बदलली जाण्याची शक्यता कमी दिसते.

आरक्षण असे
*एकूण जागा -९२
*अनुसूचित जाती-१२
*अनुसूचित जमाती-१
*ओबीसी-२१
*खुला प्रवर्ग-५८
................
तिसऱ्यांदा आरक्षण सोडत
महापालिकेसाठी आता तिसऱ्यांदा आरक्षण सोडत होत आहे. यापूर्वी एकसदस्यीय प्रभाग रचनेसाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये सोडत काढण्यात आली. त्यानंतर प्रभागरचना बदलल्यानंतर त्रिसदस्यीय प्रभागासाठी ३१ मे २०२२ मध्ये सोडत काढली. आता ओबीसी आरक्षणासह तिसऱ्यांदा सोडत काढण्यात येणार आहे.
...............

महापौरपदाच्या
आरक्षणाचे काय?
शासनाने काढलेल्या महापौरपदाच्या आरक्षणात २०२० ते २०२५ मधील पहिल्या अडीच वर्षांसाठी कोल्हापूरचे महापौरपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाले होते. मध्यंतरी ओबीसी आरक्षण नसल्याने या पदासाठी पुन्हा सोडत काढली जाणार, असे दिसत होते; पण आता ओबीसी आरक्षण मिळाल्याने महापौरपदाचे आरक्षण कायम ठेवले जाते की तेही नवीन काढले जाते, हे सरकार ठरवू शकते.

कही खुशी कही गमचे
शहरात वातावरण

कोल्हापूर, ता. २० ः ओबीसी आरक्षणासह निवडणूक होणार असल्याने ओबीसी इच्छुकांत आनंदाचे वातावरण पसरले, तर खुल्या प्रवर्गातील जागा कमी झाल्याने तयारी केलेल्या तेथील खुल्या प्रवर्गातील इच्छुकांना नाराज व्हावे लागले. खुल्या प्रवर्गात स्पर्धा वाढणार असून, ओबीसीतील इच्छुकांना दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने ओबीसींची माहिती दिली नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींशिवाय निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. नवीन सदस्यसंख्येनुसार २५ ओबीसी सदस्यांना मिळणारी संधी गेली होती. तेथील इच्छुकांना खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यातच त्रिसदस्यीय प्रभाग रचना झाल्याने मोठ्या अडचणी होत्या. त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी मागण्या केल्या जात होत्या. नव्या निर्णयानुसार आता ओबीसी आरक्षण मिळणार असल्याने ओबीसी सदस्यांना दिलासा मिळाला आहे.

उमेदवार बदलले जाणार
ज्या जागेवर पतीला संधी नाही, तिथे पत्नीची तयारी सुरू केली होती. खुल्या प्रवर्गातून जागा कमी झाल्याने अशा तयारी केलेल्या इच्छुकांना निवडणूक लढवण्याच्या इच्छेला मुरड घालावी लागणार आहे. नवीन सोडतीमध्ये कोणती जागा महिलेला, कोणती खुली होईल हे समजल्याशिवाय निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे या सोडतीनंतर उमेदवार बदलले जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79390 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top